अभिनंदनीय : दिव्यांग स्वरा चाटे हिने राज्यस्तरीय खुल्या सागरी जलतरण स्पर्धेत पटकावले ब्रॉन्झ पदक

टीम AM : ‘जिद्द असेल तर अपंगत्व कधीच आड येत नाही,’ हे अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी येथील अवघ्या आठ वर्षांच्या दिव्यांग स्वरा चाटे हिने आपल्या कर्तृत्वातून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. एका पायाचा पंजा नसतानाही स्वरा हिने अथांग समुद्राच्या लाटांना आव्हान देत खुल्या स्पर्धेत सहभागी धडधाकट स्पर्धकांना मागे टाकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

मालवण येथे नुकत्याच पार पडलेल्या 15 व्या राज्यस्तरीय खुल्या सागरी जलतरण स्पर्धेत स्वरा हिने 1 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत उल्लेखनीय कामगिरी करत ब्रॉन्झ पदक पटकावले. अत्यंत कठीण परिस्थिती, समुद्राच्या लाटा आणि आव्हानात्मक वातावरणावर मात करत तिने दाखवलेला आत्मविश्वास आणि जिद्द सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

स्वरा चाटेच्या या यशामुळे केवळ अंबाजोगाई तालुकाच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यात आणखी मोठी कामगिरी करण्यासाठी तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत.