टीम AM : नाशिकला होणारा कुंभमेळा आणि त्यासाठी तोडण्यात येणाऱ्या झाडांचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. तपोवनातील झाडं तोडू देणार नाही, यासाठी राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलं आहे. अभिनेते आणि राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदे यांनीही कंबर कसली आहे.
तपोवन येथे आंदोलन करून झाडं तोडू देणार नाही, अशी ठोस भूमिका त्यांनी घेतली. तपोवनाचा वाद सुरू असताना दुसरीकडे अभिनेते सयाजी शिंदे यांनी एक रॅप साँगच लाँच केलं आहे. या रॅप साँगमधून सामाजिक संदेश देण्यात आला आहे. गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सयाजी शिंदे हे केवळ अभिनेते नाही तर राजकीय आणि सामाजिक विषयावर भाष्य करणारं व्यक्तिमत्व आहे. सयाजी शिंदे त्यांच्या युट्यूबमधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. त्यांनी त्यांच्या युट्यूबवर नवं रॅप साँग रिलीज केलं आहे. ‘झाडखाऊ’ असं या रॅप साँगचं नाव आहे. झाड कापू नका, आम्ही ती कापूही देणार नाही, असा थेट इशाराच त्यांनी या गाण्यातून सरकारला दिला आहे.
या गाण्यात सयाजी शिंदे यांच्याबरोबर बॉलिवूड कोरिओग्राफर गणेश आचार्य देखील आहे. स्वत: सयाजी शिंदे यांनी हे रॅप साँग लिहिलं आहे आणि गायलं देखील आहे. गणेश आचार्य यांनी हे गाणं कोरिओग्राफ केलं असून सयाजी शिंदे यांनी सद्य: परिस्थिती या रॅप साँगमधून चपखलपणे मांडली आहे.



