टीम AM : अंबाजोगाई शहरालगतच्या काळवीट तलावात गुरुवारी सकाळी घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पंचायत समितीतील सेवानिवृत्त कर्मचारी विश्वनाथ बुरांडे (वय – 64) हे तलावात पोहण्यासाठी उतरले असता अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.
नेहमीप्रमाणे सकाळी पोहण्यासाठी तलावावर आलेल्या बुरांडे यांनी आपले कपडे व गळ्यातील माळ काठावर ठेवून पाण्यात प्रवेश केला. मात्र, बराच वेळ लोटूनही ते पाण्याबाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांना संशय आला. तात्काळ ही बाब त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.
घटनेची माहिती मिळताच, अंबाजोगाई नगर परिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून तलावात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. याशिवाय परळी येथून विशेष रेस्क्यू टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. पोलीस व स्थानिक प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून पुढील तपास व शोधकार्य सुरू आहे.



