राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार : किमान तापमानात होणार घट

टीम AM : राज्यात येत्या दोन दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात टप्प्याटप्प्याने एक ते तीन अंश सेल्सियसपर्यंत घट होण्याची शक्यता असून, त्यानंतर पुढील दोन दिवसांत तापमानात हळूहळू वाढ होईल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आज राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया येथे 8.4 अंश सेल्सियस नोंदवले गेले. त्याखालोखाल अहिल्यानगर येथे 8.5 अंश, नाशिक येथे 9.8 अंश तर पुण्यात सुमारे 10.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात बीड येथे 10 अंश, परभणी येथे 10.8 अंश तर छत्रपती संभाजीनगर येथे 11.2 अंश सेल्सियस किमान तापमान नोंदवण्यात आले आहे. थंडी वाढल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.