नांदगाव – सुगाव रस्त्याची दुरवस्था : रस्‍त्‍यात खड्‍डे की खड्‍ड्यात रस्‍ता ? ग्रामस्थ त्रस्त…!

टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील प्रमुख रस्ते राष्ट्रीय महामार्गांशी जोडले जात असले तरी ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अनेक ठिकाणी रस्ते पूर्णपणे उखडून गेले असून, रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता, हेच ओळखणे कठीण झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथून नांदगाव – सुगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने हा रस्ता धोकादायक बनला आहे. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी, अपघाताची शक्यता वाढली असून दुचाकीस्वारांना विशेषतः मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावरून दररोज शालेय विद्यार्थी, शेतकरी, दूध उत्पादक तसेच ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात ये – जा असते. मात्र, रस्त्याची वेळेवर दुरुस्ती न झाल्याने सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांचे तर नुकसान होतचं असून प्रवासही अधिक वेळखाऊ आणि धोकादायक बनला आहे.

स्थानिक ग्रामस्थांच्या मते, या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. अनेकदा तक्रारी करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. नांदगाव – सुगाव रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून ग्रामस्थांना सुरक्षित आणि खड्डेमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here