खापरटोनमध्ये मागासवर्गीय महिला सरपंचालाच सेवक खुर्चीवर बसू देईना…! ज्ञानेश्वरी कोमले यांनी उपसरपंच, ग्रामसेवकांवर केले गंभीर आरोप….!

टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील राजकारण इतक्या खालच्या पातळीवर येऊन ठेपलं आहे की विचार करावा तेवढे कमीच आहे. खापरटोन गावातील एका मागासवर्गीय महिला सरपंचाला‌ चक्क सेवकचं खुर्चीवर बसू देत नाही, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. महिला सक्षमीकरणाच्या कितीही बाता राज्य सरकार, समाज मारत असला तरी परिस्थिती मात्र वेगळीच आहे. खापरटोन गावातील उपसरपंच, ग्रामसेवक आणि चक्क ‘बीडीओ’ यांनी सरपंच महिलेवर किती अन्याय केला याचा पाढाच‌ आज पत्रकार परिषदेमध्ये सरपंच ज्ञानेश्वरी कोमले यांनी वाचला.

अंबाजोगाई येथील विश्रामगृहावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) यांच्या वतीने सरपंच ज्ञानेश्वरी कोमले यांच्या ‌समर्थनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला जेष्ठ नेते जीवन गायकवाड, अरुण बनसोडे, सरपंच कोमलेंच्या आई उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना ‌ज्ञानेश्वरी कोपले म्हणाल्या ‌की, खापरटोन गावात मागासवर्गीयांची संख्या अत्यंत तुरळक आहे. सरपंच पद मागासवर्गीयांसाठी राखीव असल्याने मी निवडणूक लढवली आणि जनतेने मला निवडूण दिले. परंतू, एक – दिड वर्षांच्या काळानंतर सर्व विरोधी गट एकत्र येऊन मला त्रास देऊ लागले. रोजगार हमी योजनेच्या कामात भ्रष्टाचार, घरकुल योजनेत पैसे खाणे आणि रस्त्यांच्या कामात निधी हडपणे या सारख्या गोष्टी सातत्याने उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने सुरु आहेत. यावर मी आवाज उठविला तर मला त्रास देणे सुरु केले. तसेच माझ्यावर अविश्वास ठराव देखील आणला गेला. परंतू, ते सिध्द होऊ शकला नाही. गेल्या एकदिड वर्षांपासून मला ग्रामसेवकाने हक्काचे वेतनही दिले नाही. गेल्या 18 वर्षांपासून खापरटोन गावात एकच ग्रामसेवक कार्यरत आहे, त्याची अजून बदली झाली नाही. या विरोधात मी सर्व कागदपत्रांसहित वरिष्ठांना तक्रारी केल्या. परंतू, माझ्या तक्रारीची दखल घेतली नाही. यासाठी मी आपल्या माध्यमातून समोर येऊन बोलत आहे. माझ्यावर अन्याय करणाऱ्या विरोधात कार्यवाही झाली नाही तर मी तीव्र स्वरुपाचे आंदोलन करणार असल्याचे पत्रकार परिषदेत कोमले यांनी सांगितलं.

रिपब्लिकन पार्टी आमरण उपोषण करणार

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) यांच्या वतीने‌‌ बोलताना जीवन गायकवाड म्हणाले की, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री महिला आहेत आणि बीड जिल्ह्यातचं एका महिला सरपंचावर अन्याय होतो हे दुर्दैवाची बाब आहे. सरपंच ज्ञानेश्वरी कोमले यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या तक्रारी आम्ही वरिष्ठांना केल्या आहेत. या तक्रारीवर दखल घेतली नाही तर बीड जिल्हा परिषद कार्यालयासमोर दिनांक 14 ऑगस्टपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या आमरण उपोषणात सरपंच ज्ञानेश्वरी कोमले हे देखील सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here