छत्रपती शिवाजी महाराज चौकाची दुर्दशा‌ : नगरपरिषद प्रशासन झोपेत, अंबाजोगाईकरांचा संताप…!

टीम AM : अंबाजोगाई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून चौकाच्या सुशोभीकरणासाठी बसविण्यात आलेले कठडे आणि त्यावरील स्टीलचे डिझाईन असलेले खांब अनेक ठिकाणी उखडून पडले आहेत. शहराची ओळख असलेल्या या महत्त्वाच्या चौकाची झालेली दुर्दशा नगरपरिषद प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.

दररोज हजारों नागरिक आणि वाहनचालक या चौकातून ये – जा करत असतानाही उखडलेले कठडे, दुर्लक्षित परिसर आणि देखभालीचा पूर्ण अभाव यामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीनंतरही नगरपरिषद प्रशासनाने याकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उभारलेल्या चौकाची अशी दुरवस्था झाल्याने अंबाजोगाईकरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहराच्या वैभवाचे प्रतीक असलेल्या या चौकाची देखभाल करण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

नागरिकांनी तातडीने चौकाची दुरुस्ती, नवीन कठडे बसविणे, स्वच्छता व सुशोभीकरणाची कामे हाती घेण्याची मागणी केली आहे. नगरपरिषद प्रशासन यावर काय भूमिका घेते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here