अंबाजोगाईच्या ऊसतोड मजुराच्या मुलाचा आंतरराष्ट्रीय ‘एशियन’ चॅम्पियनशिपमध्ये यशस्वी डंका

टीम AM : अंबाजोगाई शहरातील मंगळवार पेठ  भागातील रहिवाशी असलेल्या ऊसतोड कामगाराचा मुलगा आदित्य दिलीप जाधव (वय -17) या तरुणाने ‘एशियन’ चॅम्पियनशिपमध्ये कुस्तीत ‘रौप्यपदक’ पटकावत आपल्या उल्लेखनीय कामगिरीने अंबाजोगाई‌ शहरासह संपूर्ण भारत देशाची मान उंचावली आहे. व्हिएतनाम येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘एशियन’ चॅम्पियनशिप स्पर्धेत 48 किलो वजनी गटात रौप्यपदक (सिल्वर मेडल) पटकावून आदित्यने जागतिक पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवर मात करत अपार मेहनत, कठोर सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आदित्य जाधवने हे दैदिप्यमान यश मिळवले आहे. त्याची ही झेप केवळ वैयक्तिक नाही, तर लाखो गरीब घरातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

आदित्यचा सन्मान करतांना माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी…

राजकिशोर मोदी यांच्या वतीने आदित्यच्या यशाचा सन्मान

आदित्यची प्रेरणा इतर तरुण घेऊन अपार मेहनत तथा कष्टाने त्यांच्यासारखेच यश संपादन करून समाजाचे त्याचबरोबर आपल्या देशाचे नाव उज्वल करतील, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आदित्यचा सत्कार, सन्मान करतांना व्यक्त केली. आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीला दोष न देता त्याने केलेल्या कष्टाचे हे फलित असल्याचे देखील राजकिशोर मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.

अंबाजोगाई पिपल्स बँकेचे मुख्यालय सहकार भवन येथे नुकताच आदित्य जाधवचा शाल व फेटा बांधून सन्मान करण्यात आला.  या सत्कार प्रसंगी आदित्यच्या नातेवाईकांसह माजी नगरसेवक दिनेश भराडिया, दत्ता सरवदे, रफिक गवळी, विजय रापतवार, वजीर शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राजकिशोर मोदी यांनी आदित्यच्या यशाचं कौतुक करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here