‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ : ‘या’ महिलांना पैसे परत करावे लागणार, वाचा…

टीम AM : महाराष्ट्र सरकारची ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही महिलांसाठी जाहीर केलेली एक महत्त्वाची योजना आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत याच योजनेच्या जोरावर ‘महायुती’ ने मोठा राजकीय फायदा मिळवला होता.

मात्र आता या योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी पात्रतेविना लाभ घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे, अशा महिलांचा लाभ तातडीने बंद करण्यात आला आहे.

महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत विधानसभेत लेखी उत्तर दिलं. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की, 2,289 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी पात्र नसतानाही योजनेचा लाभ घेतला आहे. या महिलांना मिळणारा मासिक 1500 रुपये थेट थांबवण्यात येणार आहे.

या प्रकारामुळे सरकारला थेट 3 कोटी 58 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही रक्कम आता संबंधित महिलांकडून वसूल करण्यात येणार असल्याची माहितीही आदिती तटकरे यांनी दिली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू महिलांना दरमहा ₹1500 इतकी आर्थिक मदत देण्यात येते.

मात्र, शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या महिलांना ही मदत देण्याचा उद्देश नव्हता. तरीदेखील या महिलांनी योजनेचा गैरफायदा घेतल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे योजनेची पारदर्शकता आणि गरजूंना योग्य लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची ठरणार आहे.

मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, ‘या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. दोषी आढळलेल्या महिला कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण रक्कम वसूल केली जाईल. लाभ घेण्याची अट मोडणाऱ्यांवर योग्य ती शिस्तभंगाची कारवाई देखील केली जाईल.’ 

ही बाब स्पष्ट होताच, सरकारने तत्काळ पावलं उचलली आहेत आणि पात्रता निकषांचा पुनर्विचार सुरू केला आहे. भविष्यात योजनेचा चुकीचा वापर होऊ नये म्हणून डिजिटल पडताळणी यंत्रणा अधिक मजबूत केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here