टीम AM : 1978 साली प्रदर्शित झालेला ‘अष्टविनायक’ हा चित्रपट आजही रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसतो. या चित्रपटात सचिन पिळगावकर आणि वंदना पंडित या दोघांनी मुख्य भूमिका साकारली होती. ‘अष्टविनायक’ चित्रपटानंतर वंदना पंडित काही मोजक्या चित्रपटात झळकल्या पण कालांतराने त्या अभिनय क्षेत्रातून बाजूला झाल्या.
सुलेखा तळवलकर यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याचं कारण सांगितलं आहे. वंदना पंडित यांना लहानपणी संगीताची आवड होती. त्यांची बहीण बकुल पंडित या आज मोठ्या गायिका आहेत. त्यामुळे लहानपणीच त्यांच्यावर गाण्याचे संस्कार घडत गेले. ‘गोकुळचा चोर’ या संगीत नाटकातून त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते. पुढे नाटकातून काम करत असताना दूरदर्शनच्या मालिकेत त्यांना झळकण्याची संधी मिळाली. ही मालिका सचिन पिळगावकर यांच्या आईने पाहिली तेव्हा ‘अष्टविनायक’ चित्रपटासाठी त्यांनी वंदना यांचे नाव सुचवले. त्यावेळी वंदना पंडित या अवघ्या 17 – 18 वर्षांच्या होत्या. ‘अष्टविनायक’ चित्रपटाने त्यांना खूप प्रसिद्धी मिळवून दिली. अगदी मराठी, हिंदी चित्रपटाच्या त्यांना ऑफर येऊ लागल्या. पण बऱ्याच चित्रपटासाठी वेळ खूप लागणार असल्याने त्यांनी सगळ्या प्रोजेक्टला नकार दिला. याचदरम्यान त्यांचे लग्न ही होणार होते.
वंदना पंडित यांनी मित्र संजीव सेठ सोबत प्रेमविवाह केला. गुजराती कुटुंबात जाणार असल्याने अभिनयापेक्षा घरची जबाबदारी सांभाळणेच त्यांनी पसंत केले होते. फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना ‘बीएमसीसी’ कॉलेजची मुलं तिथे मुलींना बघायला यायची. त्यात संजीव सेठ यांना वंदना आवडल्या आणि त्यांनी डायरेक्ट लग्नाचीच मागणी घातली. तेव्हा त्यांचा हा सरळ स्वभाव पाहून वंदना पंडित यांनीही लग्नाला होकार दिला.
लग्नानंतर अभिनय क्षेत्रात काम करायचं नाही हा वंदनाजींचा वैयक्तिक निर्णय होता आणि त्यांनी तो जबाबदारीने पाळला. जाई आणि ईश्वरी अशा त्यांना दोन मुली. संजीव सेठ यांच्या निधनाने वंदनाजी खचल्या पण दहा वर्षानंतर मुलींनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्या पुन्हा अभिनय क्षेत्रात दाखल झाल्या. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेने पुन्हा त्यांना प्रकाशझोतात आणले. दरम्यान, मालिका आणि चित्रपट अशा माध्यमातून त्या प्रेक्षकांसमोर आल्या होत्या.