टीम AM : धरिला पंढरीचा चोर… हा 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पंढरीची वारी’ या चित्रपटातील एक भावस्पर्शी अभंग आहे, ज्याला संत जनाबाईंच्या मूळ अभंगावर आधार आहे. या अभंगात विठोबाला ‘पंढरीचा चोर’ अशी रूपकात्मक उपमा देण्यात आली आहे, जी भक्ताच्या अंतःकरणात विठोबाने केलेल्या अधिराज्याचे अत्यंत मार्मिक वर्णन करते.
‘पंढरीची वारी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रमाकांत कवठेकर यांनी केले असून, निर्मिती अण्णासाहेब घाटगे यांची होती. या चित्रपटाची कथा वार्षिक आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर घडते. अण्णा (बाळ धुरी) आणि त्याचे कुटुंब वारीला जाण्याची तयारी करत असतात. परंतु त्या वर्षी अण्णांना जाऊ न आल्याने त्यांच्या पत्नी आक्कासाहेब (जयश्री गडकर) आणि मुलगी मुक्ता (नंदिनी जोग) दोघींना एकट्यांनाच प्रवास करावा लागतो. प्रवासादरम्यान त्यांना ‘विठोबा’च्या रूपात एक निरागस, गोड मुलगा भेटतो, जो त्यांच्या प्रत्येक संकटावेळी मदतीला धावतो.
चित्रपटात सदा (अशोक सराफ), नाना (राजा गोसावी) आणि गणा (राघवेंद्र कडकोळ) या तीन नकारात्मक पात्रांनी दागिन्यांची चोरी करण्याचा कट रचला आहे. पण विठोबाच्या रूपातील त्या चिमुकल्यामुळे त्यांच्या सर्व योजना हाणून पडतात. त्यामुळे चित्रपट भक्ती, गूढता, आणि मानवी स्वभावाचे मिश्रण साकारतो.
धरिला पंढरीचा चोर, गळां बांधोनिया दोर,
हृदय बंदिखाना केला, आंत विठ्ठल कोंडला…
हे अभंग गायन चित्रपटात विशेष प्रसंगात सादर होते. बैठकीत सादर होणारे हे गाणं, विठोबाचे रूप धारण केलेल्या मुलामुळे अधिक प्रभावी बनते. संगीतकार बाळ पळसुले यांनी पारंपरिक अभंगसंगीत व आधुनिक चित्रपटसंगीताचा अप्रतिम संगम साधला आहे. हार्मोनियम, तबला, टाळ – मृदंग यांचा सुंदर उपयोग करीत त्यांनी भक्तीरसाला नवा अर्थ दिला. गायिका अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील भक्तीची गहिराई आणि भावनिक ओलावा, प्रेक्षकांच्या मनाला भिडतो.
या चित्रपटातील ‘धरिला पंढरीचा चोर’ आणि ‘अवघी विठाई माझी’ ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. गेल्या काही वर्षांपर्यंत दर आषाढी व कार्तिकी एकादशीला पंढरीची वारी हा चित्रपट दूरदर्शनवर आवर्जून दाखवला जायचा. त्यामुळे अनेकांच्या आठवणीत हा चित्रपट कोरला गेला आहे.
चित्रपटात विठुमाऊलीची भुमिका करणारा बालकलाकार होता बकुळ कवठेकर. चित्रपट तुम्ही पाहिला असेल तर त्याचा गोड, निरागस चेहरा लगेचच डोळ्यासमोर उभा राहतो. मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, पुण्यातील भारती विद्यापीठात फाईन आर्टचं शिक्षण घेत असताना, 2002 साली हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा अकस्मात मृत्यू झाला. आज बकुळ असता तर तो नक्की काय करत असता, हे सांगता येणार नाही, पण आपण एक प्रतिभावान कलाकार गमावला, याचं दुःख मात्र कायमच राहणार आहे.
चित्रपटाच्या छायाचित्रणात विजय देशमुख यांनी पंढरपूर, वारीचे रस्ते, पालख्या, रिंगण व वारकऱ्यांच्या जीवनशैलीचे सुंदर दर्शन घडवले आहे. जावेद सय्यद यांच्या काटेकोर संकलनामुळे चित्रपटाचा लय व गती टिकून राहतो.
धरिला पंढरीचा चोर हा अभंग केवळ गीत नसून, तो भक्तांच्या हृदयातील श्रद्धेचे आणि प्रेमाचे प्रतिक आहे. पंढरीची वारी या चित्रपटाला या अभंगामुळे केवळ लोकप्रियता नाही, तर एक अमूल्य आध्यात्मिक स्थान मिळालं आहे. भक्ती, संगीत, अभिनय आणि श्रद्धेचा संगम असलेल्या या चित्रपटाला आजही मराठी चित्रपटसृष्टीत मानाचं स्थान आहे.
लेखिका : प्रज्ञा पंडित