टीम AM : अंबाजोगाईसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे आद्यकवी मुकंदराज व बुटेनाथ परिसरात निसर्गाने मनमुराद उधळण केली आहे. हिरवाईने नटलेला परिसर, खळखळणारे लहान धबधबे, मोकळ्या हवेत दरवळणारा गारवा याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे.
सततच्या पावसामुळे मुकंदराज समाधी परिसर, बुटेनाथ डोंगररांग, आणि आजूबाजूचा संपूर्ण निसर्ग समृद्ध झाला आहे. आकाशातून पडणाऱ्या सरींमुळे झाडाझुडपांना नवे प्राण मिळाले असून, संपूर्ण परिसरात एक वेगळंच शांतीचं आणि आल्हाददायक वातावरण निर्माण झालं आहे. धुक्याच्या लाटा मुकंदराज डोंगरावर खेळताना दिसत आहेत, तर बुटेनाथ परिसरात थंड गारवा अनुभवायला मिळतोय.
पर्यटकांची वाढती वर्दळ
या निसर्गरम्य दृश्यांना पाहण्यासाठी अंबाजोगाईसह परळी, केज, धारुर आदी ठिकाणांहून पर्यटक गर्दी करत आहेत. अनेक तरुण मंडळी फोटोशूटसाठी, कौटुंबिक सहलीसाठी किंवा एकांतवासासाठी येथे येताना दिसत आहेत. मुकंदराज डोंगरावरून दिसणारा सूर्यास्त, निसर्गाच्या कुशीतले पायवाटांचे ट्रेकिंग आणि समाधी परिसरातील आध्यात्मिक शांतता पर्यटकांना वेगळाच अनुभव देत आहे. मुकुंदराज हे मराठीतील आद्य संतकवी मानले जातात. त्यांच्या समाधी स्थळाला भेट देण्यासाठी वर्षभर लोक येत असतात. समाधी परिसरात पावसाळ्यात अधिकच रमणीयता निर्माण होते. याच परिसरातील बुटेनाथ, नागनाथ मंदीर हे ठिकाण देखील पर्यटकांचं आकर्षण ठरतंय.
वन्य प्राण्यांचे दर्शन
या परिसरात पावसाळ्यात अनेक प्रकारचे पक्षी, फुलपाखरं आणि छोट्या वन्य प्राण्यांचे दर्शन होते. निसर्ग निरीक्षण आणि फोटोग्राफी प्रेमींसाठी हे ठिकाण नंदनवन ठरत आहे. वनविभाग आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने परिसरात स्वच्छता आणि नैसर्गिक पर्यावरणाचे जतन यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
अंबाजोगाई शहरातील मुकुंदराज व बुटेनाथ परिसर निसर्गसौंदर्याने बहरले असतानाही, या पर्यटनस्थळांच्या विकासाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचं सातत्याने होणारं दुर्लक्ष आजही कायम आहे. निसर्ग स्वतःहून सौंदर्य उधळत असतानाही, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र या वैभवाकडे सातत्याने डोळेझाक करतात. मुकुंदराज समाधी आणि बुटेनाथ परिसरात जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. जागोजागी खड्डे, पावसाळ्यात चिखल, यामुळे पर्यटकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. सार्वजनिक शौचालय, पिण्याचं पाणी, बसण्यासाठी निवारा, आणि माहिती फलक यांचा संपूर्ण अभाव या ठिकाणी आहे.