गांधीजींच्या विचारात मोठे तत्वज्ञान आहे – प्रा. डॉ. श्रीराम जाधव

अंबाजोगाई : महात्मा गांधींच्या विचारात मोठे तत्वज्ञान दडलेले आहे. त्यांना आपण समजाऊन घेतले पाहिजे, असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत डॉ. श्रीराम पवार यांनी केले. येथील नागापूरकर सभागृहात आयोजित योगेश्वरी कर्मचारी गणेश व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. माणिकराव लोमटे होते.

डॉ. जाधव म्हणाले, गांधीजींनी शिक्षणात श्रमाचा समावेश करण्याचे सुचविले. त्यांनी सत्याचा आग्रह कधी सोडला नाही. सामान्याच्या पातळीवर जाऊन त्यांनी काम केले. त्यांच्या असामान्य कार्यामुळेच ते महात्मा झाले. लोकांच्या मनातील भिती त्यांनी काढून टाकली. ” निर्भयता “ही त्यांनी जगाला दिलेली देणगी होय. जगातील दीडशे देशात महात्मा गांधींचे पुतळे उभारण्यात आले. त्यांचे तत्वज्ञान जगभर पसरले आहे. गांधींकडे डोळे उघडे ठेऊन पहाण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

सुरुवातीला मुख्याध्यापक के. बी. नांदगावकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय सचिन अडसुळे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या जोशी यांनी केले. शेवटी प्रियंका बेदरे यांनी सर्वांचे आभार मानले.