साहित्य संमेलन इव्हेंट नव्हे तर मूहमेन्ट व्हावे : डॉ. शिरीष खेडगीकर 

अंबाजोगाईत 11 व्या साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन 

टीम AM : साहित्य संमेलनाच्या निमित्याने आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांच्या पावन भूमीत सकल साहित्याची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा डॉ. शिरीष खेडगीकर यांनी अंबाजोगाई येथे आयोजित 11 व्या साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केली. या प्रसंगी संमेलनाध्यक्ष बालाजी सुतार, स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. या प्रसंगी रचना यांना डॉ. शैला लोहिया लेखिका पुरस्कार, उमेश मोहिते यांना मंदाताई देशमुख कथा लेखन पुरस्कार तर अलीम अजीम यांना प्राचार्य संतोष मुळावकर शिक्षक लेखक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

आपल्या विस्तारीत भाषणात बोलताना डॉ. शिरीष खेडगीकर म्हणाले की, लोकाश्रयातून साहित्य संमेलन म्हणजे आशादायक गोष्ट आहे. हे संमेलन इव्हेंट नव्हे तर मूहमेन्ट व्हावे. अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले, त्यावेळी मला सहभागी होता आले आणि त्यामुळे माझी साहित्याकडे ओढी झाली. अनेक लेखक योगेश्वरी शाळेमधून उदयास आले. अंबाजोगाईचे साहित्य संमेलन बहुसांस्कृतिक बनलं आहे, असे खेडगीकर यांनी भाषणात सांगितले. 

यावेळी बोलताना संमेलनाध्यक्ष बालाजी सुतार म्हणाले की, अंबाजोगाई साहित्य संमेलनापासून, मराठवाडा साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांपर्यंतचे सोहळे मी ‘निमंत्रित’ म्हणून मंचावरून अनुभवलेले आहेत. या सगळ्यात, मला छोट्या संमेलनांबद्दल नेहमीच प्रेम वाटत आलेलं आहे. ‘संमेलन’ ही गोष्ट व्याख्येत बसवता येणं जरासं कठीण आहे. सुगीच्या हंगामात भरघोस पीक यावं त्याप्रमाणे दिवाळीपासून पुढे पाडव्यापर्यंत वेगवेगळ्या संमेलनांची रेलचेल महाराष्ट्रात असते. काही शहरांत लिट – फेस्टही होतात. ‘दर्जा’ मात्र मोजक्याच ठिकाणी राखला जाताना दिसतो, साहित्य संमेलनांच्या माध्यमातून अशा प्रकारचा जागर अपेक्षित असतो. किमान तो जागर घडून येण्याच्या दिशेने काही हालचाली अशा संमेलनांच्या माध्यमातून निश्चितपणे घडून येतात, असं मला वाटतं.

लेखणीला दुसरा पर्याय असू शकत नाही

पुढे बोलताना सुतार म्हणाले की, स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात शिक्षणासाठी आलो, तेव्हापासून या गावाबद्दल मनात जे प्रेम निर्माण झालं, ते आज तीन दशकांनंतरही किंचितसुद्धा कमी झालेले नाही. याचं मुख्य कारण हे की, हे गाव मुळातच तितका जीव जडण्या लायक, तितका आदर करण्यालायक आहे. कला – साहित्यात रमणारी रसिक आणि समाजकारणात नीतिमत्ता जोपासणारी माणसं मला मिळाली. काही भली, काही वाईटही. अशा सगळ्या माणसांनी गावाला ‘गावपण’ दिलेलं असतं. अंबाजोगाईपुरता विचार केला, तर इथे अशी विराट उंचीची माणसं होऊन गेली, आजही आहेत, ही गोष्ट या गावाबद्दल प्रेम निर्माण करायला पुरेशी आहे. आद्यकवी मुकुंदराजांपासून, ‘पासोडी’ कार दासोपंतांपासून, प्रखर स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थांपासून, विराट ताकदीचे कादंबरीकार प्रा. रंगनाथ तिवारी आणि सुस्मृत रामकाका मुकद्दम, एकनाथराव गुरुजी, प्रा. शैला लोहिया, उर्दूतले कवी वफा साहेब यांच्यासह बहुसंख्य विविध क्षेत्रामधील व्यक्तिमत्वाचा या संदर्भात मुद्दाम उल्लेख करावाच लागेल असा इथला यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह ! सुजन राजकारणी असलेल्या सुस्मृत भगवानराव लोमटे यांच्या पुढाकारातून चालू झालेल्या आणि मागच्या तीन दशकांपासून दगडू लोमटे यांनी महाराष्ट्रभर एकहाती नावारूपाला आणलेल्या या समारोहाने या सबंध शहरावर, इथल्या पुढच्या – पुढच्या पिढ्यांवर कला – साहित्य – संगीताचे अक्षरश: संस्कार केलेले आहेत. इतिहासाला अर्थ देण्याचं आणि उन्हातल्या वर्तमानाच्या माथ्यावर छत उभं करण्याचं काम नेहमी लेखणीनेच केलेलं आहे. लेखणीला दुसरा पर्याय असू शकत नाही. ज्ञानेश्वरांना आठवा, किंवा तुकारामांना डोळ्यांसमोर येऊ द्या, म्हणजे लेखणीचं मोल लक्षात येऊ शकेल. दैनंदिन आयुष्यात आपल्या रोजच्या भोवतालातली, आपल्या निकटची माणसं रोजच्या रोज भरडली जात असतात. त्याचं कोणाला सोयरसुतक दिसत नाही. बोलण्यासाठी घरात कुणीही उपलब्ध नसल्याने पैसे मोजून नाती विकत घ्यावी लागतात हे महाराष्ट्राच्या तथाकथित सांस्कृतिक राजधानीतलंच नव्हे तर गावोगाव सगळीकडेच दिसू लागलेलं वास्तव आहे, असे त्यांनी सांगितले. 

यावेळी प्रास्ताविक करताना स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार म्हणाले की, 1998 पासून अंबाजोगाई मध्ये साहित्य संमेलन सुरू झाले. लोकाश्रयावर चालणारे हे साहित्य संमेलन असून याच्या यशस्वितेसाठी सभासद शुल्काव्यतिरिक्त कोणाकडूनही पैसे जमा केले जात नाहीत. संमेलन यशस्वी करण्यासाठी विविध स्पर्धा, कार्यशाळा आयोजित केल्या, असे त्यांनी सांगितले. या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here