गझलेचा आशय हा समाजाभिमुख असावा : संदीप गुप्ते

अंबाजोगाईत दुसऱ्या अखिल भारतीय ‘एल्गार’ मराठी गझल संमेलनाचे उद्घाटन 

टीम AM : मराठी गझलेने आशयाचा आवाका मोठा व्यापलेला आहे. परंतू, यातील आशय हा समाजाभिमुख असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गझलकार संदीप गुप्ते यांनी शनिवारी येथे केले. येथील साधना सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित दुसर्‍या अखिल भारतीय ‘एल्गार’ मराठी गझल संमेलनाचे उद्घाटन संदीप गुप्ते यांच्या हस्ते झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार डाॅ. दिलीप पांढरपट्टे हे होते. यावेळी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, ज्येष्ठ गझलकार प्रशांत वैद्य, संमेलनाचे माजी अध्यक्ष शिवाजी जवरे, योगेश्वरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष डाॅ. सुरेश खुरसाळे, प्रा. डाॅ. सदाशिव सूर्यवंशी, स्वागताध्यक्ष दगडू लोमटे, डॉ. शुभदा लोहिया, सुनील जाधव, गोरख शेंद्रे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. 

संदीप गुप्ते म्हणाले, साहित्य हे माणसाला माणसाशी जवळ आणण्याचा प्रयत्न करते, त्याचबरोबर मराठी गझलेनेही माणसं जोडण्याचा प्रयत्न केला आहे. जगालाही प्रेमाचा संदेश दिला आहे. अध्यक्षीय भाषणात डाॅ. पांढरपट्टे म्हणाले की, गझल लिहिता येण्यासाठी आपण किती साहित्य वाचतो याला महत्व आहे, वाचल्याने अनुभव विश्व समृध्द होते. गझल प्रभावी होण्यासाठी त्यातला आशय चांगला असला पाहिजे, गझल ही एक आरसा आहे. गझलेची भाषा ही साधी असली पाहिजे, गझल लिहिण्यासाठी शब्द सामर्थ्य व कवित्व असले पाहिजे, त्यामध्ये सामाजिक आशय आला पाहिजे, असे गझलेचे महत्व डाॅ. पांढरपट्टे यांनी सांगितले. यावेळी स्वागताध्यक्ष दगडू लोमटे यांनी संमेलनाची भुमीका मांडली, मावळते अध्यक्ष शिवाजी जवरे यांनी नूतन अध्यक्ष डाॅ. पांडरपट्टे यांना संमेलनाची सूत्रे सुपूर्द केली. 

पुरस्कार 

यावर्षीपासून दिला जाणारा ‘गझल साधना’ पुरस्कार गझलगंधर्व सुधाकर कदम यांना प्रदान करण्यात आला. सुरेश भटांनी सोपवलेले गझलेचे मिशन शेवटच्या श्वासापर्यंत सुरूच ठेवण्याचा संकल्प कदम यांनी व्यक्त केला.

नवोदित गझलकारांचा गौरव

या कार्यक्रमात ज्येष्ठ गझलकार हेमलता पाटील यांनी आपले वडील आणि सासरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रत्येकी एक महिला व पुरुष अशा नवोदित गझलकारांना ‘गझलांकुर’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये सागर पांपटवार आणि प्रियंका गिरी यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. संमेलनाचे सूत्रसंचालन अभिजित जोंधळे व प्रा. डाॅ. शैलजा बरूरे यांनी केले. प्रा. मेघराज पवळे यांनी आभार मानले.