टीम AM : केज तालुक्यातील अहमदपूर – अहमदनगर महामार्गावरील चंदन सावरगावजवळ भीषण अपघात झाला आहे. येथे दोन कारची समोरासमोर टक्कर झाली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला पुढील उपचारासाठी लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री अपघाताची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अहमदपूर – अहमदनगर महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक झाली. केज तालुक्यातील चंदन सावरगाव या ठिकाणी हा अपघात झाला. कार क्रमांक (एम एच-23/ई 6852) आणि (एम एच-12/एम डब्ल्यू-3563) ही दोन वाहने वाहन चालकांचे नियंत्रण सुटल्याने एकमेकांवर आदळली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करत पोलिसांना माहिती दिली.

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी बीट अंमलदार शेंडगे, हेडकॉन्स्टेबल पठाण, हेडकॉन्स्टेबल वारे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. यातील जखमी व्यक्तीला पुढील उपचारासाठी लातूर येथे हलवण्यात आले आहे.
या अपघातात अमित दिलीपराव कोमटवार (वय 35, रा. दिंद्रुड) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर दोन मृत व्यक्ती हे बीड येथील असल्याची माहिती समोर आली आहे. अमित कोमटवार हे दिंद्रुडचे सरपंच अजय कोमटवार यांचे ज्येष्ठ बंधू होते. त्यामुळे दिंद्रुड परिसरावर शोककळा पसरली आहे.