चुकीचं काम केल्यास नियमानुसार कारवाई होणारचं : उपमुख्यमंत्री अजित पवार

टीम AM : बीड ते मुंबई रेल्वे सुरू करण्याचं सुतोवाच उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ते आज बीड इथं नियोजन समितीच्या बैठकीनंतर पक्ष कार्यकर्त्यांशी बोलत होते. सर्वांसाठी शिस्तपालन आवश्यक असून, चुकीचं काम केल्यास नियमानुसार कारवाई होणारचं, असं पवार यांनी स्पष्ट केलं. 

अजित पवार म्हणाले, चांगल वागा मी तुमच्या मागे पूर्ण ताकत उभी करीन, पण चुकीचं वागलात तर कारवाई केली जाईल. जे नियम आहेत, त्या पद्धतीने कलमं लावली जातील. सातत्य राहिलं तर ‘मकोका’ पण लावला जाईल. जेवढी आपण नीट शिस्त लावू, तेवढा तुमचा फायदा होणार आहे. तुम्ही चुकीचे पायंडे बंद केले तर उद्योगपती इथं येऊन गुंतवणूक करणार आहेत. तुमच्याकडे काही साईट विंडमीलच्या चांगल्या आहेत. सोलरपॅनल बसवण्याच्या चांगल्या आहेत. आमचा प्रयत्न आहे की, मुंबई – बीड रेल्वे पण सुरु करता येते का ? का तर तुमचा मुंबईशी पण, पुण्याशी पण संपर्क कसा राहील, असेही अजित पवार यांनी सांगितले. 

दरम्यान, नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यात एकूण आराखड्यातील 536 कोटी 44 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. नगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांनी शहर स्वच्छतेकडे लक्ष द्यावं, सर्व तालुक्यांनी विकासाबाबत परस्परात सकारात्मक स्पर्धा करण्याचं आवाहनही पवार यांनी यावेळी केलं आहे.