ज्येष्ठ साहित्यिक, तत्वज्ञ डॉ. ऋषिकेश कांबळे यांचे गौरवोद्गार
टीम AM : मराठवाड्याच्या शिक्षणाचा खरा केंद्रबिंदू स्व. यशवंतराव चव्हाण असुन स्व. यशवंतराव चव्हाण यांना समजून घेऊन त्यांच्या विचारावर महाराष्ट्र चालला तर महाराष्ट्रासारखे दुसरे राज्य या देशात नाही, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक व तत्वज्ञ डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी काढले. स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने अंबाजोगाई येथे आयोजित केल्या जाणार्या 39 व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ साहित्यिक, तत्वज्ञ व उदगीर येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी डॉ. कांबळे हे बोलत होते.
या प्रसंगी समितीचे सचिव दगडू लोमटे, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, कोषाध्यक्ष सतिष नाना लोमटे, प्रा. डॉ. सोमनाथ रोडे, प्राचार्य बी. बी ठोंबरे, भगवानराव शिंदे, माजी आ. पृथ्वीराज साठे, प्रा. डॉ. कराड, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. ऋषिकेश कांबळे पुढे म्हणाले की, स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सुसंकृतपणाचे स्वप्न पाहिले, त्यांच्या स्वप्नाची कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा आहे. त्यांनी जी स्वप्न पेरली, या स्वप्नांच्या पुर्तीचा वसा देशाने घेतला होता. लोकमान्य टिळकांचा प्रभाव यशवंतराव चव्हाण यांच्यावर होता. 1927 सालच्या निवडणूकीत ब्राह्मनोत्तर चळवळीचे उमेदवार भास्कर जाधव यांचा त्यांनी वयाच्या 14 व्या वर्षी प्रचार केला. यशवंतराव चव्हाण यांच्यावर चार वर्तमानपत्राचा प्रभाव होता, त्यांचे वाचन मोठ्या प्रमानावर होते.
यशवंतराव चव्हाण यांनी 1930 साली जाणीवपूर्वक महात्मा गांधी, पंडित नेहरू यांचे नेतृत्व स्वीकारले. या काळी त्यांनी भूमिगत काम केले. त्यांच्यावर आईचे संस्कार होते. कराडमधील अस्पृशांच्या मुलांना शिकता यावे, यासाठी यशवंतराव अस्पृशांच्या वस्त्यामध्ये जाऊन शिकवत असत. यशवंतराव समजून घेऊन त्यांच्या विचारावर महाराष्ट्र चालला तर महाराष्ट्रासारखे दुसरे राज्य या देशात नाही.
1946 च्या सार्वत्रिक निवडणुकाच्यावेळी ते पार्लमेंट्री बोर्डाचे सेक्रेटरी म्हणून नियुक्त झाले. त्यांनी 1 मे 1960 रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व त्यानंतर मराठा व ओबीसीसाठी ईबीसीची सवलत आणली. त्यामुळेच 90 टक्के मुलं शिकल्या गेली. मराठवाड्याच्या शिक्षणाचा खरा केंद्रबिंदू यशवंतराव चव्हाण होत. त्यांना पत्नी वेणूताई यांची खंबीर साथ होती. सरळ व संवेदनशील राजकारणी कसा असावा, यासाठी यशवंतराव यांच्याकडे पहावे लागेल.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समारोह समितीचे सचिव दगडू लोमटे, पाहुण्यांचा परिचय डॉ. कमलाकर कांबळे, आभार प्रदर्शन प्रा. भगवानराव शिंदे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. मेघराज पौळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्वच क्षेत्रातील नागरिकांची उपस्थिती होती.