महाराष्ट्रात पुढील तीन – चार दिवस पाऊस : 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट

टीम AM : महाराष्ट्रात यंदा अनेक जिल्ह्यांमध्ये पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. राज्यात येत्या तीन – चार दिवसांत काही भागात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तसेच शनिवारी राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

राज्यात 25, 26, 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी पावसाची शक्यता असून ठाणे, पालघर, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिव या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच विदर्भात बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळ आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे.