टीम AM : अमोल पालेकर हे 80 आणि 90 च्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहेत. पालेकर हे ‘गोलमाल’, ‘रंग बिरंगी’ यांसारख्या सिचुएशनल कॉमेडी चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘छोटी सी बात’, ‘गोलमाल’ आणि ‘चितचोर’ यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले. सामान्य माणसाचे सुपरस्टार अमोल पालेकर आज 79 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
अमोल पालेकर यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1944 रोजी महाराष्ट्रातील एका सामान्य कुटुंबात झाला. पालेकरांच्या कुटुंबाचा चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नव्हता. त्यांचे वडील पोस्ट ऑफिसमध्ये तर आई एका खासगी कंपनीत कामाला होती.
ग्रॅज्युएशन झाल्यावर अमोल पालेकरांनीही आपले करिअर निवडले होते आणि ते आरामात नोकरी करत होते. ते कधी अभिनेते होतील असे स्वप्नातही त्यांनी विचार केला नव्हता, पण नशिबाचा खेळ नेहमीच वेगळा असतो. अमोल पालेकर अभिनेता होण्यापूर्वी बँकेत लिपिक म्हणून काम करायचे हे फार कमी लोकांना माहिती असेल. आपल्या भविष्याचा विचार करून अमोल हे काम अगदी आरामात करत होते.
पण प्रेमात पडलेला माणूस काहीही करायला मागेपुढे पाहत नाही. असेच, अमोल पालेकरांच्या बाबतीतही घडले. एके दिवशी त्यांची नजर एका मुलीवर पडली, त्या मुलीचे नाव चित्रा होते. चित्राला पाहताच अमोल तिच्या प्रेमात पडले. मात्र, ही मुलगी रंगभूमीशी निगडित होती. मग अमोल पालेकरांनीही तोच मार्ग अवलंबला आणि थोड्याच काळात त्यांना थिएटर करायला आवडू लागले. अमोल पालेकरांची सत्यदेव दुबे यांच्याशी थिएटरमध्ये भेट झाली, त्यांनी अमोल यांना त्यांच्या एका नाटकात कास्ट केले. यानंतर पालेकरांना त्यांचा अभिनय दाखवण्याची पहिली संधी मिळाली.
पालेकरांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांनी सत्यदेव दुबे यांच्याकडून अभिनयाचे मूलभूत कौशल्य शिकले आहे. यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये प्रवास सुरू केला. चित्रपट निर्माते बासू चॅटर्जी यांनी अमोल यांचा अभिनय पाहिला आणि त्यांना त्यांच्या ‘रजनीगंधा’ चित्रपटात कास्ट केले. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. या चित्रपटातील हिरो म्हणजेच अमोल पालेकर लोकांच्या मनात घर करून गेला. यानंतर अमोल पालेकर यांना सातत्याने चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. त्याचबरोबर एकामागून एक त्यांच्या सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत होते.
अमोल पालेकरांचे 3 चित्रपट हिट झाले, तेव्हा त्यांनी बँकेची नोकरी सोडली. त्याचवेळी चित्रासोबतचे त्यांचे लव्ह लाईफही चांगले चालले होते. दोघांनीही 1969 मध्ये लग्न केले. मात्र, त्यांचे नाते कायम टिकू शकले नाही. दोघांनी 2001 मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर अमोल पालेकरांनी संध्या गोखले यांच्यासोबत लग्न केले. अमोल पालेकर उत्तम अभिनेत्यासोबतच उत्तम चित्रकारही आहेत. ते राजकीय विषयांमध्ये देखील सक्रिय असतात. अनेकदा वेगवेगळ्या राजकिय मुद्द्यांवर ते आपले सडेतोड मत मांडतात. अमोल पालेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.