टीम AM : लेखक, अभिनेते गिरीश कुलकर्णी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म. 25 नोव्हेंबर 1977 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील परांड येथे झाला. मराठी नाट्य चित्रपट सृष्टीमधल्या उत्तम अभिनेत्यांच्या यादीतलं एक महत्त्वाचं नांव म्हणजे, ‘गिरीश पांडुरंग कुलकर्णी.’ उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा येथे त्यांचा जन्म झाला तरी त्याचं शालेय शिक्षण पुण्यातल्या नवीन मराठी शाळा आणि न्यू इंग्लिश स्कूल इथे झालं.
लातूर इथून गिरीश कुलकर्णी यांनी मेकॅनिकल अभियांत्रिकीमधील पदविका प्राप्त केली. लातूरमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी रंगभूमीवर आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केली होती. पदविका पूर्ण केल्यानंतर काही काळ त्यांनी ‘रेडीओ मिर्ची’ मध्ये क्लस्टर प्रोग्रामिंग हेड म्हणूनही काम पाहीलं. त्यानंतर मात्र, त्यांनी लेखनावर आपले लक्ष केंद्रित केलं. उमेश कुलकर्णी हे त्यांचे बंधू. ‘संस्कार भारती’ च्या नाट्यविभागात गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी आणि श्रीकांत यादव या त्रिकुटाने विविध प्रयोग केले. अनेक एकांकिका केल्या आणि गाजवल्या देखील. ‘प्रसंगोत्पात’ ही त्यांची एकांकिका विशेष गाजली आणि तिने अनेक पुरस्कारही प्राप्त केले. ‘समाजस्वास्थ्य’, ‘आनंद भोग’ अशा नाटकांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली.
उमेश कुलकर्णी यांनी ‘एफ.टी.आय.आय’ साठी केलेल्या लघुपटांच्या निर्मितीमधे गिरीश कुलकर्णी यांची मोठी मदत मिळाली. त्यानंतर आपल्याला भावेल असाच चित्रपट करायचा, या इराद्याने या जोडीने चित्रपट क्षेत्रात उडी घेतली. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वळू’ या चित्रपटामुळे ‘गिरीश कुलकर्णी’ हे नाव रसिकांना माहीत झाले. या चित्रपटाच्या लेखनाबरोबरच गिरीश कुलकर्णी यांनी त्यामधील ‘जिवन्या’ ही मुख्य व्यक्तिरेखा देखील साकारली होती. ‘वळू’ बरोबरच ‘विहीर’, ‘देऊळ’ ‘मसाला’ ‘धप्पा’ या चित्रपटांचेही उत्तम लेखन गिरीश कुलकर्णी यांनी केले.
अभिनयाची आवड असलेल्या ह्या अप्रतिम अभिनेत्याला कारकिर्दीच्या सुरुवातीलाच चांगल्या भूमिका मिळाल्यामुळे त्याच्या आवडीला खतपाणी मिळालं. ‘गाभरीचा पाऊस’ या चित्रपटामध्ये त्यांनी साकारलेली शेतकर्याची भूमिका लक्षणीय ठरली. ‘देऊळ’ चित्रपट त्यांच्या अभिनय प्रवासातला सर्वोत्तम चित्रपट ठरला. या चित्रपटातल्या मुख्य भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच या चित्रपटातल्या खटकेबाज संवाद लेखनासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संवाद लेखनाचाही पुरस्कार मिळाला.
‘मसाला’, ‘पुणे 52’, ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’, ‘फास्टर फेणे’, ‘बॉईज 2’, ‘भाई व्यक्ती की वल्ली’ या मराठी तर, ‘अग्ली’, ‘दंगल’, ‘काबिल’, ‘फेनी खान’ या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी ताकदीच्या दिग्दर्शकासोबत काम करत आपल्या अभिनयाची उत्तम चुणूक दाखवून दिली. ‘सेक्रेड गेम’ ह्या वेबसिरीजमधील त्यांनी वठवलेलं पात्र अजूनही रसिकांच्या स्मरणात आहे. ‘पाणी फाऊंडेशन’ मध्येही गिरीश कुलकर्णी कार्यरत आहेत. गिरीश यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.
शब्दांकन : संजीव वेलणकर