आज १० सप्टेंबर रोजी सायं.५ वा नांदेड येथे होणार अंत्यसंस्कार
अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचे वडील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक भास्करराव देशमुख ( वय ८८ वर्ष ) यांचे वृध्दापकाळाच्या आजाराने आज दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता नांदेड येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले. आज १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:०० वाजता नांदेड येथील गोवर्धन घाट स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नांदेड जिल्ह्यातील चिकाळा येथील मुळ रहिवासी असलेले भास्करराव देशमुख यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्यात आणि हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या लढ्यात हिरहिरीने सहभाग घेतला होता. इंग्रजांविरुद्ध महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या स्वातंत्र लढ्यातील नांदेड जिल्ह्यातील ते एक प्रमुख कार्यकर्ते होते. यावेळी करण्यात आलेल्या अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग महत्वाचा होता. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यानंतर त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात सहभाग घेतला होता. भास्करराव देशमुख गेली अनेक दिवसापासून वृध्दापकाळाच्या आजाराने आजारी होते. गेली कांही महिन्यापुर्वी अन्ननलिकेच्या त्रासावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात व अंबाजोगाई येथील स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मध्यंतरी या आजारातुन थोडा रिलीफ मिळाल्यावर त्यांनी नांदेड येथे आराम करणे पसंद केले असल्यामुळे सध्या ते नांदेड येथेच वास्तव्यास होते. गेली दोन दिलसापासून त्यांना परत त्रास होत असल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. मात्र उपचारास प्रतिसाद न देता आज १० सप्टेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख आणि पुणे येथील उदयोजक मुकुंद देशमुख यांचे वडील होते. भास्करराव देशमुख यांच्या पार्थिवावर आज १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:०० वाजता नांदेड येथील गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.