संघर्षभूमीवरील ग्रंथवाचन उपक्रमाला 600 दिवस पूर्ण : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 16 ग्रंथांचे अखंड वाचन…!

दररोज अखंडपणे ग्रंथवाचन करणारा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम 

टीम AM : अंबाजोगाईत ‘पुस्तकांचं गाव’ या संकल्पनेचा गवगवा होत असताना एकीकडे वाचन संस्कृती लोप पावत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, संघर्षभूमी येथून वाचन संस्कृती जिवंत ठेवणारी एक प्रेरणादायी बातमी समोर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, संघर्षभूमी येथे सुरू असलेल्या नियमित ग्रंथवाचन उपक्रमाला तब्बल 600 दिवस पूर्ण झाले आहेत.

वर्षावासानिमित्त 21 जुलै 2024 रोजी या ग्रंथवाचन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. दररोज अखंडपणे सुरू असलेल्या या उपक्रमाने 12 मार्च 2026 रोजी 600 दिवसांचा टप्पा गाठला. 600 व्या वाचन दिनी संजय हतागळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘बहिष्कृत भारत’ आणि ‘मूकनायक’ मधील लेखांचे वाचन केले. या प्रसंगी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त केला.

या ग्रंथवाचन उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’, ‘प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती’ तसेच ‘बुद्ध की कार्ल मार्क्स’ या ग्रंथांचे वाचन करण्यात आले. या टप्प्यात एकूण 24 वाचकांनी सहभाग घेतला. दुसऱ्या टप्प्यात डॉ. आंबेडकर यांच्या भाषण खंड 1, 2 आणि 3 यांचे वाचन झाले. तिसऱ्या टप्प्यात ‘भारतातील जाती : त्यांची घडण, उत्पत्ती आणि प्रसार’, ‘अस्पृश्य मुळचे कोण?’, ‘शूद्र पूर्वी कोण होते?’, ‘जाती व्यवस्थेचे निर्मूलन’, ‘पुणे करार’, ‘राज्य आणि अल्पसंख्यांक’ आणि ‘हिंदू कोड बिल’ या ग्रंथांचे वाचन करण्यात आले. चौथ्या टप्प्यात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता’ खंड 1 व 2 यांचे वाचन झाले. 

सध्या ‘बहिष्कृत भारत’ आणि ‘मूकनायक’ या ग्रंथांचे वाचन सुरू आहे.या उपक्रमात आतापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 16 ग्रंथांचे वाचन पूर्ण झाले असून दररोज अखंडपणे ग्रंथवाचन करणारा हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम असल्याचे सांगितले जाते.

आजच्या वाचन कार्यक्रमास विश्वनाथ सावंत, गुलाबराव गायकवाड, बाबुभाऊ कांबळे, चंद्रमणी गोवंदे आदी उपस्थित होते. या प्रेरणादायी उपक्रमात नियमित सहभाग घेणाऱ्या सर्वांचे ॲड. शाम तांगडे, ॲड. संदीप थोरात, डॉ. गणेश सूर्यवंशी, खंडेराव जाधव गुरुजी, डॉ. किर्तीराज लोणारे आदींनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here