अंबाजोगाई : येथील भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून जमिनीच्या मोजमापात व नकाशात जाणीवपूर्वक खोडसाळपणा करून शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. या घटनेचा निषेध नोंदवत सोमवारी सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटना व पीडित शेतकरी यांनी भूमिअभिलेख कार्यालयासमोर ठिय्या मांडून बोंब मारो आंदोलन छेडले.
भूमिअभिलेख कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांना सातत्याने वेठीस धरले जाते. अधिकारी व कर्मचारी संगनमत करून जमिनीच्या मोजमापात व नकाशात जाणीवपूर्वक खोडसाळपमा करतात. या अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकारीही पाठीशी घालतात. यामुळे अनेक शेतकऱ्यांची प्रकरणे प्रलंबित पडले आहेत. तांत्रिक कारणे दाखवून शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी केली जात नाही. अशी शेकडो प्रकरणे या कार्यालयात रखडलेली आहेत. वर्षानुवर्षे शेतकरी या कार्यालयात खेटे घालत आहेत. तरीही त्यांना न्याय मिळत नाही. या कार्यालयातील बेजबाबदार अधिकाऱ्यांना बडतर्फ करा. दोषींवर तात्काळ कार्यवाही करा. सर्व्हेनंबरच्या भूमापन अभिलेखाप्रमाणे मोजमापे करून हद्दी, खुणा व क्षेत्रफळ कायम करावे, तसे नकाशे शेतकऱ्यांना देण्यात यावेत. अशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, उपाध्यक्ष प्रमोद पांचाळ, तालुकाध्यक्ष योगेश शेळके, शहराध्यक्ष अभिजित लोमटे, पीडित शेतकरी मधुकर पांडे, मारूती केंद्रे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.