परळी : परळी विधानसभा मतदार संघातील बंजारा समाज बांधवांचा भव्य मेळावा उद्या मंगळवार दि.10 सप्टेंबर रोजी परळी येथे आयोजित करण्यात आला असून,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व किनवटचे आ.प्रदिप नाईक हे या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 11 वाजता अंबाजोगाई रोड वरील जगमित्र नगर जुना नाका, येथे हा मेळावा बंजारा समाज कृती समिती, परळी च्या वतीने आयोजित करण्यात आला असून, बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसदर्भात या मेळाव्यात चर्चा करण्यात येणार आहे.
बंजारा समाजाचा एस.टी. प्रवर्गात समावेश करावा, माजी न्या.सच्चर यांचा अहवाल तंतोतंत मंजुर करून त्याचे कायद्यात रूपांतर करावे, 500 लोकसंख्या असलेल्या तांड्यांना स्वतंत्र महसूली दर्जा व स्वतंत्र ग्रामपंचायतींचा दर्जा द्यावा, तांडा, वस्ती सुधार योजना पूर्ववत सुरू करून सदर योजनेवर आर्थिक मदत मिळवुन द्यावी, वसंतराव नाईक महामंडळास लोकसंख्येच्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून द्यावा, तांडा, वाडी, वस्तीवरील वंचित समाजाला घरकुलाचा लाभ मिळावा, महिला बचत गटांचे सक्षमीकरण व्हावे, बंजारा समाजातील विद्यार्थ्यांना पदवी पर्यंतच्या मोफत शिक्षणाची सोय करावी, आदी प्रमुख मागण्यांसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्याच्या ठिकाणी अखिल भारतीय बंजारा कवी ह.भ.प. प्रेमदास महाराज वणोलीकर यांच्या भजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून, परळी विधानसभा मतदार संघातील जास्तीत जास्त बंजारा समाज बांधवांनी उपस्थित राहावे, यासाठी बंजारा समाज कृती समितीचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.