टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या प्रक्रियेत आज महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी लोकविकास महाआघाडीचे नगरसेवक दिनेश भराडिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दुसरीकडे स्वीकृत सदस्य म्हणून लोकविकास महाआघाडीचे राजकिशोर मोदी आणि बबन लोमटे यांची तर परिवर्तन जनविकास आघाडीकडून संजय गंभीरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नगरपरिषदेच्या मिटिंग हॉलमध्ये झालेल्या सर्वसाधारण बैठकीत ही प्रकिया पार पडली. यावेळी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा आणि मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. दिनेश भराडिया यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड होताच नगरपरिषद परिसरात लोकविकास महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. तर दुसरीकडे परिवर्तन जनविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांत काही प्रमाणात निराशाजनक चित्र दिसून आले. नगरपरिषदेच्या प्रांगणात उपनगराध्यक्ष दिनेश भराडिया, राजकिशोर मोदी आणि बबन लोमटे यांचा कार्यकर्त्यांनी जोशपूर्ण वातावरणात सत्कार केला. यावेळी मोदी समर्थकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मारवाडी समाजात आनंदाचे वातावरण
नगरपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक गोष्ट घडली आहे. एकाच समाजाला नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा आणि उपनगराध्यक्ष दिनेश भराडिया हे राजस्थानी मारवाडी समाजाचे आहेत. त्यामुळे राजस्थानी मारवाडी समाजात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
नगरपरिषदेत सत्तासंघर्ष तीव्र होणार…!
नगरपरिषदेत माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांची एन्ट्री झाल्याने सत्तासंघर्ष अधिक तीव्र होण्याचे चिन्ह दिसून येत आहेत. नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत नंदकिशोर मुंदडा आणि राजकिशोर मोदी यांच्यात कांटे की टक्कर झाली होती. यात नंदकिशोर मुंदडा यांनी बाजी मारली होती. ती सल कुठे तरी राजकिशोर मोदींच्या मनात असल्याने त्यांनी लोकविकास महाआघाडीच्या माध्यमातून स्वीकृत सदस्य म्हणून नगरपरिषदेत एन्ट्री केली आहे. नगरपरिषदेचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा जरी असले तरी लोकविकास महाआघाडीकडे स्पष्ट बहुमत असल्याने मोदी गटाचाच नगरपरिषदेत वरचष्मा राहणार आहे, हे मात्र निश्चित आहे.
माजी नगरसेवक शेख रहिम यांच्या कार्यकर्त्यांत नाराजी कायम
अंबाजोगाई नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी माजी उपनगराध्यक्ष शेख रहिम यांना परिवर्तन जनविकास आघाडीकडून डावलण्यात आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर उमटला आहे. तशा आशयाच्या पोस्ट देखील समाजमाध्यमांवर दिसून येत आहेत. दरम्यान, आता परिवर्तन जनविकास आघाडीचे नेते त्यांची मनधरणी कशी करतात, हे येणारा काळचं ठरवेल. परंतू, शेख रहीम यांना डावलण्याची चर्चा मात्र शहरात दिसून येत आहे. त्यामुळे नगरपरिषदेत आज ‘कंही खुशी कंही गम’ चे चित्र पहावयास मिळाले.



