उपनगराध्यक्षपदी निवड आणि अनपेक्षित सत्कार : अंबाजोगाईच्या राजकारणात नव्या चर्चांचा धुरळा…!

टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नगरसेवक दिनेश भराडिया यांची बिनविरोध निवड होताच शहराच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांचे खंदेसमर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी उपनगराध्यक्ष शेख रहीम भाई यांनी दिनेश भराडिया यांचा केलेला सत्कार सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.

शेख रहिम यांनी केलेला सत्कार केवळ औपचारिक नसून त्यामागे ठळक राजकीय संकेत दडलेले असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. कारण, नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी माजी उपनगराध्यक्ष शेख रहीम यांना परिवर्तन जनविकास आघाडीकडून डावलण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यासंदर्भातील पोस्ट समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, कार्यकर्त्यांमध्ये असंतोष व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे, नगरपरिषदेच्या निवडणुकीत लोकविकास महाआघाडीला कडाडून विरोध करणारे शेख रहीम यांनीच आता उपनगराध्यक्षपदी निवड झालेल्या दिनेश भराडिया यांचा थेट कार्यालयात बोलावून सत्कार केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या घडामोडीमुळे परिवर्तन जनविकास आघाडीतील अंतर्गत राजकीय समीकरणे तसेच भविष्यातील वाटचालीबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. निवडीनंतर तात्काळ झालेल्या या सत्काराकडे विविध गटांकडून वेगवेगळ्या अर्थाने पाहिले जात असून, हा सन्मान नेमका कोणत्या राजकीय संदेशासाठी ? असा सवाल नागरिकांमध्ये आणि राजकीय निरीक्षकांमध्ये उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अंबाजोगाईच्या राजकारणात ही घटना सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here