टीम AM : केज मतदारसंघाच्या राजकारणात आज मोठा भूकंप झाला असून माजी आमदार संगिता ठोंबरे यांनी आज दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये (शिंदे गट) जंगी प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे केज मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट, पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केज मतदारसंघात संगिता ठोंबरे यांचा दांडगा जनसंपर्क असून ग्रामीण भागात त्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशामुळे केजच्या राजकारणात नवी आघाडी उभी राहत असल्याचे चित्र दिसत असून, आगामी जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, संगिता ठोंबरे यांचा प्रवेश हा शिंदे गटासाठी मोठी ताकद ठरणार असून, विरोधकांच्या गोटात खळबळ उडाल्याचे चित्र आहे.



