उपनगराध्यक्ष दिनेश भराडिया यांचा मोठा निर्णय : 100 स्वच्छता कामगारांना पुन्हा कामावर घेत दिला दिलासा…!

टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषदेतील स्वच्छता कामगारांच्या प्रश्नांबाबत गेल्या काही दिवसांपासून असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. तांत्रिक कारणामुळे कमी करण्यात आलेल्या तब्बल 100 स्वच्छता कामगारांमुळे नगरपरिषदेत स्वच्छतेचे कामही विस्कळीत झाले होते. या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच दिनेश भराडिया यांनी कामगारांच्या हितासाठी मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे.

तांत्रिक कारणामुळे कमी करण्यात आलेल्या 100 स्वच्छता कामगारांना पुन्हा कामावर घेत त्यांना दिलासा देण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच स्वच्छता कामगारांनी उपनगराध्यक्ष दिनेश भराडिया यांची भेट घेऊन कामावर घेण्याची विनंती केली होती. यावर कसलाही विलंब न‌ करता उपनगराध्यक्ष दिनेश भराडिया ‌यांनी स्वच्छता निरिक्षक अनंत वेडे यांना सदरिल कामगारांना कामावर घेण्याचे सूचित केले होते. त्यानुसार आज सदरील कामगार कामावर रुजू झाले आहेत. या निर्णयामुळे एकीकडे कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न सुटला असून, दुसरीकडे शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. 

या निर्णयामुळे स्वच्छता कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या कुटुंबियांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांकडूनही उपनगराध्यक्ष दिनेश भराडिया यांच्या या सकारात्मक आणि लोकहितकारी निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. स्वच्छता कामगार हे शहराचे खरे शिल्पकार असून त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याची भावना या निर्णयातून व्यक्त होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. अंबाजोगाई शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी कामगारांच्या बळावरच पुढील वाटचाल होणार असल्याचेही या वेळी बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here