टीम AM : शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या ‘शक्तिपीठ’ महामार्गास शेतकऱ्यांचा कडाडून विरोध होत असून राज्य सरकारने हा प्रस्तावित महामार्ग तात्काळ रद्द करावा, यासाठी राज्यातील शेतकऱ्यांसह परळी, अंबाजोगाई तालुक्यातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांनी मंगळवार दि.1 जुलै रोजी कृषिदिनी अनेक ठिकाणी ‘रास्तारोको’ करून या महामार्गास तीव्र विरोध केला. अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापुर, धायगुडा पिंपळा आणि परळी तालुक्यातील तळेगाव या ठिकाणी शेतकरी महिला आणि त्यांचे कुटूंबीय एकत्र येत ‘रास्ता रोको’ करत शासनाचा निषेध करत या महामार्गाला विरोध केला.
बीड जिल्ह्यातील परळी व अंबाजोगाई तालुक्यातील ज्या गाव शिवारातून हा महामार्ग प्रस्तावित असून या महामार्गामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बाधित अबाल वृद्ध शेतकरी आणि महिला यांनी बीड जिल्हा किसान सभेच्या नेतृत्वाखाली एकत्र येत अनेक ठिकाणी ‘रास्ता रोको’ केला. धायगुडा पिंपळा या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकरी पुरुष – महिलांना अटक करून दुपारी सोडण्यात आलं. किसान सभेचे ॲड. अजय बुरांडे, कॉ. मुरलीधर नागरगोजे, भाई मोहन गुंड, कॉ. भगवान बडे, कॉ. मदन वाघमारे व्यंकट ढाकणे, सुशील शिंदे, मारुती इरलापल्ले, ॲड. जावेद पटेल, दीपक शिंदे, अरुण पाटील, पुंडलिक धायगुडे, बावणे विठ्ठल, मीनाताई डांगे, आशाबाई पवार, भानुदास मुंडे, मारुती डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो शेतकरी ठिकठिकाणी ‘रास्तारोको’ मध्ये सहभागी झाले होते.
आंदोलन यापेक्षा अधिक तीव्र स्वरूप घेईल
सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत असून शेतकऱ्यांना भूमिहीन करून देशोधडीला लावणारा शक्तीपीठ महामार्गाच्या सीमांकन आणि जमीन संपादन करण्यासाठी सरकार पोलिसी बळाचा वापर करत आहे. अधिकारी देखील शेतकऱ्यांना धमक्या देण्याचा प्रकार बीड जिल्ह्यात सुरू असून सरकारच्या ह्या सर्व दडपशाही विरोधात बीड जिल्ह्यातील शेतकरी पेटून उठला आहे. सत्ताधारी जर सत्तेचा आणि बळाचा गैरवापर करत असतील तर हे आंदोलन यापेक्षा अधिक तीव्र स्वरूप घेईल. – ॲड. अजय बुरांडे, किसान सभा, बीड.