नियमांपेक्षा ज्यादा दर आकारल्यास केंद्रचालकावर कारवाई करणार : उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे
टीम AM : सर्वसामान्य गोरगरीब जनतेला शासकीय सुविधांचा सुलभ लाभ घेता यावा, म्हणून ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे ऑनलाईन कामे केली जातात. या कामासाठी शासनाने निर्धारित रक्कम केलेली आहे. मात्र, ‘आपले सरकार’ केंद्र चालक हे मनमानीपणे अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन लूटमार करत असल्याच्या अनेक तक्रारी सोशल माध्यमातून वरिष्ठांपर्यंत केल्यामुळे उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांनी महसूलच्या इतर अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ‘आपले सरकार’ केंद्रावर जाऊन पाच केंद्र चालकांची तपासणी केल्याने केंद्रचालकांचे धाबे दणाणले आहेत.
उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांनी ही कारवाई आज दिनांक 30 जून रोजी दुपारी केली. या तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्याने तीन केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले असून, एका केंद्र चालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या प्रिया झांबरे यांनी व्हिडीओसह सादर केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. सय्यद मिर मुबीन अली यांच्याकडे परवाना नसताना केंद्र चालवले जात होते. त्यांच्यावर अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, नियमांपेक्षा ज्यादा दर आकारल्यास केंद्रचालकांवर कारवाई करणार असल्याचे उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे. उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांनी केलेल्या कारवाईचे जनतेतून स्वागत करण्यात येत आहे.