अंबाजोगाई : कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी कठीण परिश्रम घ्यावे लागतात. ध्येय निश्चित केले तर यश मिळतेच, असे प्रतिपादन निवृत्त कॅप्टन नंदकुमार जगताप यांनी येथे केले.
येथील नागापूरकर सभागृहात योगेश्वरी शिक्षण संस्था कर्मचारी गणेश व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष ॲड. शिवाजीराव कराड होते.
एव्हरेस्ट चढताना आलेले अनुभव कथन करताना जगताप म्हणाले, प्रत्येक पाऊल विचार करून व आदेशानुसार टाकावे लागते. सैन्यदलातील माझे सहकारी आणि मी अठ्ठेचाळीस दिवसाच्या परिश्रमाने ८,८३८ मीटर उंचावर जाऊन जगातील सर्वात उंच असलेला एव्हरेस्ट पर्वत सर केला. तेथे आपल्या देशाचा तिरंगा फडकविला. एव्हरेस्ट मोहिमेवर जाण्यापूर्वी निवड प्रक्रिया असते. नेपाळ मार्गे एव्हरेस्टवर जाण्याचा मार्ग असून तेथील बर्फाळ भागातील आठवणीही त्यांनी सांगिल्या. हवामानाचे अंदाज घेऊन मार्गक्रमण केले. अनेक पर्यटकांचा मृत्यूही होतो. जिद्ध अंगी बाळगल्यामुळे आम्ही मोहिम पूर्ण केली, असेही त्यांनी सांगितले. चित्रफितीद्वारे त्यांनी एव्हरेस्ट मोहिमेची माहिती दिली.
सुरुवातीला प्राचार्य डॉ.उदय जोशी व ॲड. शिवाजीराव कराड यांनी कॅप्टन जगताप यांचा सत्कार केला.संयोजक गणेश कदम यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून प्रा. गणेश पिंगळे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी संचालक,विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.