मनाची दारे उघडल्याशिवाय सुख मिळणार नाही – डॉ. रमेश रावळकर

अंबाजोगाई : मनाची दारे उघडल्याशिवाय खरे सुख मिळणार नाही, असे प्रतिपादन औरंगाबाद येथील डॉ. रमेश रावळकर यांनी येथे केले. योगेश्वरी कर्मचारी गणेश व्याख्यानमालेत ते ” सुख नक्की काय असतं ! “या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव गणपत व्यास होते.

डॉ.रावळकर म्हणाले, समाजात विभक्त कुटूंब पध्दती येत आहे. घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक जण स्वार्थी बनत चालला आहे. सुख शोधण्याचे मार्ग वेगळे आहेत. पैशातही समाधान नाही. सत्ता,संपत्ती,सौंदर्य या मध्ये ही सुख नाही. भौतिक सुखा मागे न धावता नैसर्गिक सुख अनुभवावे. आपल्या गरजाही मर्यादित ठेवल्या पाहीजेत. आपला मुलगा उत्तम माणूस झाला पाहिजे. त्याच्या क्षमता ओळखा. स्पर्धेचे घोडे बनून धाऊ नये. त्यामुळे सुखापासून दूर जात आहोत. वाचन संस्कृती संपत चालली आहे. मुलांबरोबर खेळण्यातही सुख आसते. आईची मिठी आणि बापाचा पाठीवर हात असला तरी सुख भेटते, असेही त्यांनी सांगितले.

सुरुवातीला मुख्याध्यापक के. बी . नांदगावकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय अनंत जोशी यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता पेठे यांनी केले. शेवटी छ्त्रभूज ढेंबरे यांनी सर्वांचे आभार मानले.