भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना जाहीर

अंबाजोगाई : यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दिला जाणार कै. भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ पत्रकार, संपादक तथा महाराष्ट्रातील वक्ते मधुकरजी भावे, मुंबई यांना जाहीर झाला आहे. भगवानराव लोमटे यांच्या स्मृती दिनी 19 सप्टेंबर 2019 रोजी हा पुरस्कार महाराष्ट्राचे माजी मंत्री व महात्मा गांधी मिशन (एमजीएम) अध्यक्ष कमलकिशोरजी कदम नांदेड यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.


हा पुरस्कार दरवर्षी राज्यपातळीवर सुसंस्कृत राजकारणी, साहित्य, क्रीडा, ललितकला, नाट्य व सिने अभिनेता, संगीत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता, सहकार व शिक्षण या क्षेत्रातील एका मान्यवरांस दिला जातो. 25 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी हा पुरस्कार यशवंतराव गडाख-पाटील, विजय कुवळेकर, ना. धों. महानोर, रामदास फुटाणे, पं. नाथराव नेरळकर व विजय कोलते यांना प्रदान करण्यात आला आहे.

यावर्षी हा पुरस्कार पत्रकार मधुकर भावे यांना देण्यात येत आहे. गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर 2019 रोजी आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात सायंकाळी 5.30 वाजता प्रदान करण्यात येईल. अशी माहिती यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली आहे.