मुकुंदराज आदर्श शिक्षक पुरस्कार गणेश तौर व शिवकुमार निर्मळे यांना प्रदान

अंबाजोगाई : शिक्षक दिनाचे औचित्य साधून अनुसया सेवाभावी बहुउदेशीय संस्थेच्या वतीने देण्यात येणारा मुकुंदराज आदर्श शिक्षक पुरस्कार गणेश तौर आणि शिवकुमार निर्मळे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप गौरव चिन्ह, सन्मानपत्र व शाल असे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक डॉ. अमृतराव देशपांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ शास्त्रज्ञ प्राचार्य डॉ.उदय जोशी, अनंतराव देशपांडे, रामकृष्ण पवार व माधव इंगळे होते.

यावेळी प्राचार्य डॉ. उदय जोशी म्हणाले, जगात भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे.माता पासून मातीपर्यंत एका वेलांटीमध्ये आयुष्य आहे. माणूस म्हणून जगण्यासाठी सेवाभावी संस्थेची गरज आहे. रामकृष्ण पवार म्हणाले, गरीब विद्यार्थ्यांना मोफत ज्ञानाची शिदोरी देण्याचा प्रयत्न अर्धशतकापासून सुरू आहे. आजही नापास झालेल्या गरीब मुलांना विनामूल्य मार्गदर्शन करतो. डॉ. अमृत देशपांडे यांनी सत्कारमूर्तींना शुभेच्छा दिल्या.

सत्काराला उत्तर देताना गणेश तौर म्हणाले, ग्रामिण भागात अध्यापन करताना काही अडचणी येतात. सुट्याच्या काळात आम्ही स्वखर्चाने शाळा रंगविली. ते पाहून ग्रामस्थांनी मोठे सहकार्य केले. शिवकुमार निर्मळे म्हणाले, आपण मैदानावर खेळाडू व छात्र घडविले. त्यापैकी शेकडो छात्र देश रक्षणासाठी सैन्यदलात गेले.पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात आपण प्रामाणिक काम केले.

यावेळी सहाशिक्षिका मीना अंबुरे यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सुरूवातीला संयोजक ॲड. प्रशांत पवार यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचे स्वागत डॉ व्यंकट इंगोले, राम निर्मळ यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ कुडके यांनी केले.शेवटी कृष्णा मुंडे यांनी सर्वांचे आभार मानले.