बारावीनंतरच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरु : ऑनलाईन नोंदणी 30 जूनपर्यंत, वाचा…

टीम AM : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बारावीनंतर पदवी, पदविका व प्रमाणपत्र अशा एकूण 62 अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु आहेत. या अभ्यासक्रमांना ’समर्थ पोर्टल’ च्या माध्यमातून 30 जूनपर्यंत नोंदणी करण्यात येणार आहे.

कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षापासून पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमांना गुणवत्तेच्या आधारावर थेट प्रवेश देण्यात येत आहेत. तर व्यावसायिक अभ्यासक्रमांना राज्यशासनाच्या ’सीईटी’मार्फत गुणवत्तेवर प्रवेश देण्यात येतील. थेट प्रवेश देण्यात येणाऱ्यांमध्ये पुढील अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यामध्ये बॅचलर ऑफ व्होकेशन स्टडीज (बी.व्होक), इंडस्ट्रियल ऑटोमेशन व बी. व्होक – ऑटोमोबाईल या अभ्यासक्रमांना प्रत्येकी 40 जागा आहेत. तर वृत्तपत्रविद्या विभागात बी.ए.एमसीजे या अभ्यासक्रमात 40 जागा आहेत. नाट्यशास्त्र विभागात बी.पी.ए., बी.डी. हे दोन कोर्स आहेत. ललित कला विभागात बीएफए – पेटिंग, अप्लाईड आर्टस हे दोन कोर्स आहेत. मुद्रण तंत्रज्ञान विभागात अ‍ॅडव्हान्सड डिप्लोमा इन प्रिटिंग टेक्नॉलाजी हा अभ्यासक्रम सुरु आहे.

चार ऑनर्स पदवी अभ्यासक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने चार वर्षांचा पदवी ’ऑनर्स’ कोर्स यंदा सुरु झाले आहेत.  या विद्यार्थ्यांना दोन सेमेस्टर प्रत्यक्ष नामांकित कंपनीत काम करण्याची संधी मिळणार असून स्टायपंड अर्थात छात्रवृत्ती ही देण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे व्यावसायाभिमूख व चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम आहेत. यामध्ये ’अ‍ॅप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम’ (एईडीपी) हा चार वर्षाचा पदवी अभ्यासकम असणार आहे. बी.एस्सी. (ऑनर्स) इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, बी.एस्सी. (ऑनर्स) डाटा सायन्स, बीसीए (ऑनर्स) व बीए मानसशास्त्र (ऑनर्स) अशा चार अभ्यासक्रमांचा समावेश आहे. बीएस्सी डेटा सायन्स ला तीस तर उर्वरति तीन अभ्यासक्रमांना प्रत्येकी 40 जागा असणार आहेत. या कोर्ससाठी बारावी विज्ञान, कला व वाणिज्य उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रानिक्स, संगणकशास्त्र, व्यवस्थापशास्त्र व मानसशास्त्र विभागाशी संपर्क साधावा, असे पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव माधव वागतकर यांनी कळविले आहे. या चारही अभ्यासक्रमांसाठी नामांकित कंपन्यासोबत सामंजस्य करार (एमओयु) करण्यात आले आहेत. तसेच या कंपन्याचे प्रत्यक्ष कामकाज अनुभवही विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. 

’सीईटी’ मार्फत प्रवेश

केमिकल टेक्नॉलॉजी विभागात राज्यशासनाच्या ’सीईटी’ मार्फत प्रवेश देण्यात येणार आहेत. विभागात बी. टेक. फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी व बी. टेक. फुड टेक्नॉलॉजी हे दोन पदवी अभ्यासक्रम असून प्रत्येकी 12 जागा आहेत. ’एम.एच.- सीईटी’ मार्फत प्रवेश घ्यावा, असे विभागप्रमुख डॉ. भगवान साखळे यांनी कळविले आहे.