टीम AM : मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘मुळशी पॅटर्न’ हे नाव आवर्जून घेतले जाते. पुण्यातील कडवट वास्तव मांडणाऱ्या या चित्रपटातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहिलं. त्यातीलच एक लक्षवेधी आणि छोटेखानी पण ठसठशीत भूमिका म्हणजे ‘चहावाली’. ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे मालविका गायकवाड. अलीकडेच मालविकानं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंड येथून पदवी पूर्ण केली असून, ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
एक छोटं पात्र… पण लक्षात राहिलेली अभिनेत्री
‘मुळशी पॅटर्न’ मध्ये मालविकानं साकारलेली चहावालीची भूमिका फार मोठी नव्हती, मात्र, तिच्या सहज अभिनयामुळे ती प्रेक्षकांच्या मनात ठसली. हा मालविकाचा पहिलाच आणि शेवटचा चित्रपट ठरला. चित्रपटानंतर तिचं सिद्धार्थ सिंघवीसोबत लग्न झालं आणि ती पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाली.
सामान्य नव्हे, थेट राजघराण्यातून आलेली
मालविका ही बडोद्याच्या गायकवाड राजघराण्याची राजकन्या आहे. तीने पुण्याच्या सिंहगड कॉलेजमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याचदरम्यान ‘मुळशी पॅटर्न’ च्या ऑडिशनसाठी निवड झाली.
व्यवसायातही यशस्वी
मालविकाने केवळ अभिनय आणि शिक्षणातच नव्हे, तर व्यवसाय क्षेत्रातही यश मिळवलं आहे. सेंद्रिय शेतीविषयी जागरूकता वाढावी म्हणून तिनं ‘द ऑरगॅनिक कार्बन’ नावानं कंपनी सुरू केली आणि ‘हंपी A2’ या ब्रँड अंतर्गत सेंद्रिय दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री सुरु केली.