राष्ट्रीय महामार्गातील दोन टप्प्यांसाठी 421 कोटींची कामे मंजूर
टीम AM : बीड जिल्ह्यातून अनेक राष्ट्रीय महामार्ग गेले असून वाहूतुकीच्या दृष्टीने माजलगाव ते केजमधील धारूर जवळचा घाट ‘ब्लॅकस्पॉट’ ठरला होता. शिवाय लातूर ते लोखंडीसावरगाव दरम्यान बर्दापुर फाटा ते लोखंडी सावरगाव रस्त्यातील उर्वरित लांबीचे चौपदरीकरण करण्याची बाबही महत्वाची होती. याबाबत खा. बजरंग सोनवणे यांनी वारंवार पाठपुरावा केला आणि या पाठपुराव्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाठबळ देत 421 कोटींची ही दोन्ही कामे सन 25 – 26 च्या वार्षिक नियोजनामध्ये मंजुरीस प्रस्तावित केली आहेत.
राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 (सी) माजलगाव ते केजमधील धारुर जवळच्या घाट अरुंद असून चढ जास्त असल्यामुळे वारंवार अपघात होत होते, तसेच प्रवासात वेळ लागत होता. हा घाट ‘ब्लॅकस्पॉट’ म्हणूनही जाहीर करण्यात आलेला आहे. ही बाब विचारात घेऊन बीडचे खा. बजरंग सोनवणे यांनी धारुर घाटातील रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून थेटेगव्हाण मार्गे कमी चढाईचा व अधिक रुंदीचा चौपदरी रस्ता करण्यासाठी जुलै 24 पासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे व रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाकडे सतत पाठपुरावा केला. सन 25 – 26 चा कृति आराखडा व वार्षिक नियोजनात सदरील काम घेण्यात आले असून या 11 कि.मी रस्त्यासाठी तब्बल 171 कोटी रुपये खर्च प्रस्तावित केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धारुर घाटातील वाहतुक समस्या सोडवण्यासाठी आग्रही मागणी होत होती. घाटामध्ये चढ जास्त असल्यामुळे जड वाहतुक लांबच्या मार्गाने करावी लागत होती. अरुंद रस्त्यामुळे घाटामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले होते. हे काम पूर्ण झाल्यास शेगाव ते पंढरपूर रस्ता वाहतुक सुरळीत होईल. माजलगाव, वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांची शेतीमाल वाहतुक सुलभ होणार आहे. या सोबतचं लातूर ते लोखंडीसावरगाव दरम्यान बर्दापुर फाटा ते लोखंडी सावरगाव रस्ता या उर्वरित लांबीचे चौपदरीकरण करण्याची मागणी करण्यात आली होती. 250 कोटी रुपये अंदाजित किंमत असलेल्या 18 कि.मी. चे काम सन 25 – 26 च्या वार्षिक नियोजनामध्ये मंजुरीस प्रस्तावित करण्यात आले असून दोन्ही कामे करण्यास उच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे. खा. बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रीय महामार्गात येणारे अडथळे आणि महत्वाच्या विषयाकडे लक्ष घातलेले आहे. धारूर घाटातील ब्लॅकस्पॉटवर अनेकदा अपघात होवून बळी गेलेले आहेत. परिणामी, अनेक संसार उघड्यावर पडलेले आहेत. आता याठिकाणी पर्यायी मार्ग काढून येथील अपघात टाळण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आहे.
‘या’ कामांसाठीही सुरू आहेत प्रयत्न
अहमदपूर ते पिंपळा धायगुडा, धायगुडा पिंपळा ते लोखंडी सावरगाव व लोखंडी सावरगाव ते मांजरसुंबा या रस्त्यांचे चौपदरीकरणाचे प्रस्ताव समितीकडून मंजुरी करुन घेऊन त्या कामांनाही प्राधान्याने मंजुरी घेण्यात येईल.
मंजुरी देण्यात आलेल्या दोन्ही कामाच्या निविदा लवकरच होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल. केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांचे मोलाचे सहकार्य लाभत असून त्याबद्दल मी जिल्ह्याच्या वतीने त्यांचे आभार मानतो.
– खा. बजरंग सोनवणे, बीड.