शिक्षक दिनी पुस येथे आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण
अंबाजोगाई : समाज घडविण्यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या शिक्षकांचा कार्याची नोंद घेऊन समाजाने वेळोवेळी त्यांचा सन्मान केला पाहिजे असे प्रतिपादन बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांनी केले. ते तालुक्यातील पुस येथे शिक्षक दिनानिमित्त आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते.
पुस येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण गुरुवार, दि. 5 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद शाळा पुस येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूस ग्रामपंचायतचे सरपंच वसंतराव देशमुख, ग्रामपंचायत सदस्य राधाकृष्ण कचरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक कचरे, उपाध्यक्ष धनराज गायके, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती काळबांडे मॅडम आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी दिपप्रज्ज्वलन व प्रतिमापुजन करण्यात आले. मान्यवरांच्या स्वागतानंतर पूस येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेतील शिक्षिका योगिता चिंचोलकर व शिक्षक दिपक गायकवाड या दोन उपक्रमशिल शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सभापती राजेसाहेब देशमुख यांचे हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,शाल, पुष्पहार पुष्पगुच्छ असे आहे.
यावेळी बोलताना सभापती राजेसाहेब देशमुख म्हणाले की, विद्यार्थी घडविण्यात शिक्षका सोबतच पालकांचीही जबाबदारी असते. ही जबाबदारी ओळखून पालकांनी विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा याकरीता नेहमी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, विद्यार्थ्यांना वेळ द्यावा, वेळोवेळी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती जाणून घ्यावी,विद्यार्थ्यांच्या ज्ञानकक्षा रुंदावण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतून सुधारित अभ्यासक्रम शिकवला जातो.जि.प. शाळेचे शिक्षक हे अभ्यासू,गुणवान, मेहनती आहेत.त्यामुळे उपक्रमशील शिक्षकांचा समाजाने कायम सन्मान करावा अशी अपेक्षा यावेळी सभापती राजेश देशमुख यांनी व्यक्त केली. प्रारंभी अशोक कचरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पुस ग्रामपंचायतचे सदस्य राधाकृष्ण कचरे यांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप सरपंच वसंतराव देशमुख यांनी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साहेबराव कावळे यांनी करून उपस्थितांचे आभार शिक्षक जोगदंड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा,पुस यांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.