आ. संगीता ठोंबरे यांच्या प्रयत्नांना यश
अंबाजोगाई : पाणीटंचाईच्या प्रसंगी अंबाजोगाईकरांसाठी शेवटचे आशास्थान असलेल्या काळवटी तलावाची उंची अर्धा मीटरने वाढविण्यास शासनाने शुक्रवारी मान्यता दिली. केज विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आ. संगीता ठोंबरे यांनी मागील चार वर्षापासून पालकमंत्री ना. पंकजा मुंडे आणि खा. प्रीतम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली काळवटी तलावाची उंची वाढविण्यासाठी पाठपुरावा केला होता.
अंबाजोगाई शहराला मुख्यत्वे मांजरा धरणातून पाणीपुरवठा होतो तर काळवटी तलावाचा राखीव पाणीसाठा म्हणून वापर होतो. मांजरा प्रकल्पातील पाणी संपल्यानंतर काळवटी तलावातील पाणीसाठ्यामुळे शहराला अल्पकाळासाठी दिलासा मिळतो. मात्र लोकसंख्या वाढत गेल्याने हा पाणीसाठा देखील अपुरा ठरू लागला होता. त्यामुळे तलावात अधिक पाणीसाठा राहावा यासाठी तलावाची उंची दोन मीटरने वाढविण्याची मागणी पुढे आली. लोकभावना लक्षात घेता आ. संगीता ठोंबरे यांनी मागील चार वर्षापासून या मागणीला प्राधान्य देत शासनाकडे ही मागणी लावून धरली आणि सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले आणि राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने या प्रश्नी सकारात्मक प्रतिसाद देत साठवण तलावाची उंची वाढविण्यासाठी तत्वतः मान्यता दिली होती. त्यानंतर अंबाजोगाई नगर परिषदेने नगर परिषद संचालनालयामार्फत राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीकडे प्रस्ताव पाठविला होता. या समितीने ४ सप्टेंबर रोजीच्या बैठकीत काळवटी तलावाची उंची अर्धा मीटरने वाढविण्याची शिफारस शासनाकडे केली होती. सदरील शिफारशीवर सकारात्मक निर्णय घेत शासनाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियान अंतर्गत काळवटी तलावाची उंची अर्धा मीटरने वाढविण्यास शुक्रवारी मान्यता दिली असून त्यासाठी ३ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर केला आहे. या खर्चातील ८५ टक्के वाटा राज्यसरकार उचलणार आहे तर उर्वरित १५ टक्के खर्च नगर पालिका करणार असून लवकरच या कामाची निविदा निघणार आहे. दुष्काळाच्या आणि पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर असलेल्या अंबाजोगाईकरांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला असून भविष्यात काळवटी तलावात मुबलक पाणीसाठा राहून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी मिटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.