राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई ; 13 लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

अंबाजोगाई : बीड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक आर.ए.घोरपडे व दुय्यम निरीक्षक विजय राठोड यांनी केज तालुक्यातील धारूर- आडस रोडवर महिंद्रा स्कॉर्पिओ या वाहनातून विनापरवाना मद्याची वाहतूक करत असताना संजय रामलिंग तपसे (वय 40 वर्षे,रा.कसबा विभाग,धारुर ता.धारूर, जि.बीड ) या इसमास अटक केली. त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 च्या कलम 65 (ई) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाच्या वतीने देण्यात आली आहे.

सोमवार,दि.2 सप्टेंबर रोजी केज तालुक्यातील धारूर-आडस रोडवर महिंद्रा स्कॉर्पियो क्रमांक (एम.एच-44,एच-74 21) या चारचाकी वाहनातून विनापरवाना मद्याची वाहतूक करत असताना विविध ब्रँडच्या देशी दारूच्या 15 पेट्या जप्त करून संजय रामलिंग तपसे या इसमाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईत जवान एन.बी.मोरे, एस.के.सय्यद व वाहनचालक के.एस. जारवाल यांनीही सहभाग घेतला.राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने माहे जून ते ऑगस्ट-2019 या कालावधीत बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध व बनावट दारू धंद्यांवर टाकलेल्या धाडीत एकूण 36 गुन्हे नोंदवले असून आरोपींना महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत अटक केलेली आहे. या कालावधीत 10 लिटर हातभट्टी दारू,150 लिटर देशी दारू, 41 लिटर विदेशी दारू,11 लिटर बियर,13,200 लिटर रसायन, दोन चार चाकी वाहने व दोन दुचाकी वाहने असा एकूण 13 लाख 97 हजार 529 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध दारू धंद्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष लक्ष ठेवले जात असून हॉटेल रस्त्यालगतचे ढाबे व दारू विक्रीच्या अवैध ठिकाणांवर सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अबकारी अनुज्ञप्त्यांचेही अचानकपणे निरीक्षण करण्यात येत असून मद्याची विक्री नियमानुसार होते किंवा नाही याची तपासणी करण्यात येत आहे.