प्रत्येकाने एक झाड लावून गणेशोत्सव साजरा करावा – पत्रकार मुडेगावकर

बालगणेश व्याख्यानमालेचे उद्घाटन संपन्न

अंबाजोगाई : आजच्या पर्यावरणातील बदलत्या परिस्थितीस वृक्षतोड कारणीभूत असल्याचे सांगून, झाडे लावुन, जोपासली नाहीत तर आगामी काळात त्याचे भयंकर दुष्परिणाम भोगावे लागतील असे सांगून प्रत्येकाने एक झाड लावून जोपासावे आणि हा गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते गजानन मुडेगावकर यांनी केले.

येथील वैद्यकीय परिसरमधील कै. दे. बा .गणगे, योगेश्वरी नूतन प्रा. विद्यालयात मागील 17 वर्षांपासून सुरू असलेल्या बालगणेश व्याख्यानमालेस आज प्रारंभ झाला. या व्याख्यानमालेचे उदघाटन व यावर्षीच्या व्याख्यान मालेच प्रथम पुष्प सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार गजानन मुडेगावकर यांनी गुंफले. यावेळी ते बोलत होते. या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यस्थानी संस्था सहसचिव अंजली गोस्वामी तर व्यासपीठावर विभागप्रमुख रविंद्र ठाकूर व शिक्षकप्रतिनिधी अशोक आखाडे यांची उपस्थिती होती.

मुडेगावकर बोलताना म्हणाले की, मुलांना वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे यांच्या माध्यमातून वृक्षाचे महत्व सांगून आजच्या पर्यावरणातील बदलत्या परिस्थितीस वृक्षतोड कारणीभूत असल्याचे सांगून, त्याचे दुष्परिणाम सांगितले. प्रत्येकाने एक झाड लावून जोपासावे आणि हा गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या बाल व्याख्यानमालेचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे या शाळेतील इयत्ता चौथी ते सातवीचे विद्यार्थीच संपूर्ण संयोजन आणि नियोजन त्यांच्या विभागप्रमुख व वर्गशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करतात व ही व्याख्यानमाला उत्स्फूर्तपणे साजरी करतात.

यावर्षीच्या बालगणेश व्याख्यानमालेत गजानन मुडेगावकर, प्राचार्य यु. डी. जोशी, प्राचार्य रमण सोनवळकर, प्राचार्य रमण देशपांडे, वर्षा जालनेकर (मुख्याध्यापक), दिनकर जोशी, शिवकुमार निर्मळे या व्याख्यात्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख रविंद्र ठाकूर यांनी, सूत्रसंचालन कु. मैत्रयी तांबुरे, कु. अंकिता फुटाणे यांनी केले.. पाहुण्यांचा परिचय कु. श्रुती वाघमारे हिने करून दिला. कार्यक्रमात सूचना कु. स्मितल बनसोडे हिने मांडली व त्यास अनुमोदन कु.तेजस्विनी पांचाळ हिने दिले,या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. शर्वरी माळी हिने केले.