परळी : शहरात एका युवकाचा मृतदेह दि. २ सप्टेंबर रोजी आढळुन आल्याने परळी शहरासह संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला होता. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी तातडीने तपास करत ताब्यात घेतले असुन ही हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी अतिषय वेगाने तपासाची चक्र फिरवत काही तासातच आरोपींना अटक करून आरोपींनी गुन्हा कबुल केल्याचे सांगितले आहे.
परळी शहरातील गणेश पार भागातील अनिल शिवराजअप्पा हालगे वय ( 22 ) खाजगी नोकरीला असलेला या युवकाचा मृतदेह पोलीस ठाण्यापासून बाजूला असलेल्या कब्रस्तानमध्ये आढळुन आला. या युवकाच्या शरीरावर हत्याराने मारल्याच्या खुना दिसून आल्याने ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने तपास करत दोघांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिस खाक्या दाखवताच दोन्ही आरोपींनी गुन्हयाची कबूली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान ही हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी परळी पोलीस ठाण्यात आरोपीविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.