अंबाजोगाई : शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळासाठी “प्लास्टीक प्रदुषणाचा राक्षस” या देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सर्व मंडळांनी सहभाग घेऊन नोंदणी करावी, असे आवाहन येथील प्लास्टीक मुक्त अभियानाचे डॉ. नितीन चाटे व सर्व सदस्यांनी केले आहे.
घरगुती गणेश मुर्तीसमोर हा देखावा करणारांनाही या स्पर्धेत सहभागी होता येईल. त्यासाठी स्वतंत्र पारितोषिक राहणार आहेत. येथील प्लास्टिक मुक्त अभियान समुहाने यंदाच्या उन्हाळ्यात जयंती व वाण नदीत वाहून आलेले शेकडो टन प्लास्टिक गोळा केले. यातून नदी स्वच्छता अभियान राबवले होते. यापुढे असे प्लास्टिक नदीत वाहून येऊ नये यासाठी प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद केला पाहिजे, त्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. गणेशोत्सवात मोठ्याप्रमाणात याची जनजागृती होऊ शकते हा उद्देश समोर ठेवून या अभियानांतर्गत देखावा स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
‘प्लास्टिक प्रदुषणाचा राक्षस’ या विषयावर जनजागृतीपर देखावा उभारणारी गणेश मंडळ व वैयक्तीक गणेश मुर्ती स्थापना करून त्यासमोर प्लास्टीक मुक्तीचा संदेश देणा-या भक्तांनाही या स्पर्धेत सहभागी होता येईल. दोन्ही गटात प्रथम, व्दितीय व तृतीय असे पारितोषिक राहिल, याचे स्वरूप ढाल किंवा सन्मानचिन्ह असे राहणार आहे. हा देखावा सादर करणा-या गणेश मंडळांनी एकुण उत्सवात कमीत कमी प्लास्टीकचा वापर करणे अपेक्षित आहे. देखाव्यात कुठेच प्लास्टिक व थर्माकोलचा वापर असू नये याची नोंद घ्यावी.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ‘प्लास्टीक मुक्ती अभियान’, मनस्विनी प्रकल्प, धडपड कार्यालय, सायगाव नाका, अंबाजोगाई येथे करावी. असे आवाहन प्रा. डॉ. अरुंधती पाटील, सत्येंदु रापतवार व प्रविण चोकडा, विजय रापतवार, प्रविण चोकडा, दत्ता देवकते, दिनेश शिंदे, सत्येंदु रापतवार, दत्ता सरवदे, महेश वेदपाठक, अजय रापतवार, आशिष राठोड, सुगत सरवदे, अमोल वेडे, ॲड.रामेश्वर ढेले, डॉ.अविनाश मुंडे, अनंत मलवाड, आनंद किर्दंत यांनी केले आहे.