कुंबेफळला महामार्गावर शेतकऱ्यांचा तासभर ‘ रास्ता रोको ‘

मागण्या पूर्ण झाल्या नाही तर विधानसभा निवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार

केज : मराठवाडयात सध्या दुष्काळाची भीषन परस्थिती असुन सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. जनावरांना खायला चारा नाही. लोकांना प्यायला पाणी नाही, तरीही सरकारकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत. शेतकऱ्यांनी पेरलेली सर्व पीके हातातून गेली आहेत. कर्जमाफी केवळ नावाला झाली असून आता सरसगट संपूर्ण कर्जमाफी द्या, हेक्टरी १ लाख रु मदत द्या, पिकांचे तात्काळ पंचनामे करा या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी कुंबेफळला महामार्गावर एक तास रास्ता रोको करत महामार्ग जाम केला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार सचिन देशपांडे यांना देण्यात आले. यात काही शेतकऱ्यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त करून मागण्या पूर्ण नाहीच झाल्या तर या भागातील सर्वच गावे आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकतील असा इशारा देखील यावेळी शेतकऱ्यांनी दिला.

सध्या मराठवाड्यात व विशेषतः केज तालुक्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत पाऊस अत्यल्प असून जनावरांना चारा नाही, पिण्याच्या पाण्याचे मोठे हाल सुरु आहेत, नविन राशन कार्डधारकांना धान्य नाही अशा विविध समस्या असताना शासन व विरोधक आप आपल्या राजकीय यात्रा काढण्यात दंग आहेत. जनतेला वाऱ्यावर सोडून या यात्रा कुठे जातील याची त्यांना जाणीव नाही, परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला यांना कोणालाही वेळ नाही त्यामुळे येणाऱ्या काळात आचारसंहितेपूर्वी या प्रश्नावर निर्णय न घेतल्यास या आंदोलनात सहभागी असलेले कुंबेफळ, सारणी, आनंदगाव, जवळबन, भाटुंबा, जानेगाव, सोनिजवळा, चंदनसावरगाव, उंदरी, होळ, कळंबअंबा, मानेवाडी, केकत सारणी, बनकरंजा, ढाकेफळ, पिसेगाव यासह इतरही गाव विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे यावेळी संबंधीत गावच्या शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. यावेळी शेकडो शेतकरी मोठया संख्येने हजर होते. शेतकऱ्यांनी वाळलेले सोयाबीन उपटून आणून रस्त्यावर टाकले तर बैलगाडी व जनावर देखील आणून रस्त्यावर सोडली होती.

यावेळी प्रत्येक गावातून एका शेतकऱ्याने आपल्या भावना येथे व्यक्त केल्या. यामध्ये कुंबेफळ मधून प्रकाश जाडकर, सारणी मधून संतोष सोनवणे, जवळबन मधून राजाभाऊ करपे, सोनिजवळा मधून शंकर पाखरे, आनंदगाव मधून अशोक भोगजकर, हनुमंत सौदागर, पिसेगाव मधून महादेव सूर्यवंशी, ढाकेफळ मधून अरविंद थोरात, जानेगाव मधुन शाम चटप, भाई मोहन गुंड यांनी यावेळी भावना व्यक्त केल्या. युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक आनंद झोटे यांनी या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेऊन आंदोलन शांततेत पार पाडले. तर नायब तहसिलदार यांनी यावेळी आंदोलन कर्त्यांना आपल्या सर्वांच्या भावना आम्ही प्रशासकीय पातळीवर आजच जिल्हाधिकारी यांना कळवून कार्यवाही करू असे सांगितले.