बर्दापूर परिसरात सव्वा सहा लाखांचा गुटखा जप्त

अंबाजोगाई : तालुक्यातील बर्दापूर परिसरात बीडच्या अन्न सुरक्षा विभागाने मोठी कारवाई केली असुन सुमारे सव्वा सहा लाखांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई साळुंकवाडी शिवारात विना परवाना व बेकायदेशीर वाहतूक करताना करण्यात आली. या प्रकरणी सुरेश दत्तात्रय खांडापूरे ( रा. साळुंकवाडी ता. अंबाजोगाई) याच्या विरोधात बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बर्दापूर परिसरातील साळुंकवाडी शिवारातून विविध प्रकारच्या गुटख्याची विनापरवाना व बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची खबर अन्न सुरक्षा आधिकाऱ्यांना मिळाली. त्यानूसार अधिकाऱ्यांनी तत्काळ सापळा रचून गुटखा घेवून जाणारे वाहन ताब्यात घेतले. दरम्यान केलेल्या कारवाईमध्ये गोवा गुटखा 23 बॅग,बाबा गुटखा 3 बॅग, राज निवास 4 बॅग, विमल गुटखा 12 बॅग यासह वाहन असा एकुन सहा लाख सतरा हजार तीनशे रूपयाचा माल जप्त केला. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे यांच्या फिर्यादीवरून सुरेश दत्तात्रय खांडापुरे याच्याविरूध्द बर्दापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्ष लक्ष्मण केंद्रे करत आहेत.