जिल्हाधिका-यांना दिले निवेदन
अंबाजोगाई : केज मतदार संघातील अंबाजोगाई व केज तालुक्यासह नेकनूर हे विभाग दुष्काळग्रस्त म्हणुन जाहीर करावेत अशी मागणी माजी आ.पृथ्वीराज साठे यांनी
जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आ.पृथ्वीराज साठे यांनी गुरूवार,दि.२९ ऑगस्ट रोजी बीड येथे जावून जिल्हाधिका-यांना निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केज मतदार संघातील अंबाजोगाई, केज आणि नेकनुर भागातील महसुली मंडळात यावर्षी अत्यल्प व पुरेसा पाऊस न झाल्याने पेरणी झालेली सर्व पिके जळून,वाळुन करपून गेली आहेत. पिण्याच्या पाण्याचा, जनावरांचा चार्याचा प्रश्न तसेच मजुरांना व शेतकर्यांना काम उपलब्ध होत नाही. त्यामुळे खालील मागण्यांचा तात्काळ विचार करून केज मतदारसंघातील अंबाजोगाई व केज हे तालुके व नेकनूर महसुली विभाग हे दुष्काळग्रस्त म्हणुन जाहिर करावेत.ज्या शेतकर्यांची पिके वाळुन,करपून गेली आहेत,त्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत,जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात.रोजगार हमीची कामे तात्काळ सुरू करावीत.रब्बी पिक विमा वाटप करावा,बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई – केज – धारूर भागात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत आहे. ज्या मांजरा धरणावर ही शहरे आवलंबुन आहेत त्या मांजरा धरणातील पाणी साठा संपत आहे.तेंव्हा मांजरा धरणामध्ये उजनी धरणातून पाणी सोडण्यासाठी शासनस्तरांवर प्रयत्न करावेत.
अंबाजोगाई – परळी भागातील ज्या शेतकर्यांना पिकविमा वाटप चालु आहे तो संथ गतीने चालु आहे.तो जलद करण्याची आवश्यकता आहे तसेच मंजुर पिकविम्यामध्ये बर्याच शेतकर्यांचे नांव,पत्ता, बँक खाते व जिल्हा, तालुका,बदल झाले आहेत ते कागदोपत्राच्या अधारे ग्राह्य धरून पिकविमा वाटप करावा. वरील मागण्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करावा,अन्यथा मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा केज विधानसभा मतदार संघाचे माजी आ. पृथ्वीराज साठे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.