टीम AM : राजकारण आणि समाजकारण अशा अनेक विषयांवर स्पष्ट मत मांडणारे म्हणून नितीन गडकरींची ख्याती आहे. नितीन गडकरींनी एका वृत्तवाहिनीला दिलेली, मुलाखत सध्या समाज माध्यमावर चांगलीच व्हायरल होत आहे. यावेळी गडकरींना अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांना ते पंतप्रधान असते तर काय केले असते असा प्रश्न करण्यात आला.
तुम्हाला जर एखादी जादूची कांडी देण्यात आली. ज्यामुळे तुम्ही देशाच्या राजकारणात मोठा बदल घडवू शकले तर तुम्ही अशी कोणती गोष्टी कराल ? किंवा तुम्हाला 24 तासांसाठी पंतप्रधान करण्यात आले तर तुम्ही काय कराल ? असा प्रश्न गडकरींना विचारण्यात आला. यावर निवेदक तुम्ही पंतप्रधान पदाशी संबंधित उत्तर बहुतेक देणार नाही, असेही गडकरींना म्हणाले.
काय म्हणाले गडकरी ?
यावर गडकरींनी सांगितले की, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये माझे एक मित्र होते, रामदास फुटाणे नावाचे. ते हास्य व्यंग कवी आहेत. त्यांची कविता होती. हा देश प्रवचनांनी सुधारला नाही आणि बदमाशांमुळे काही बिघडलेला नाही. जग, आपल्या हिशोबाने चालत असतं. ज्याला जसा आवडतं त्या पद्धतीने तो चालतो. त्याकडे लक्ष देण्यापेक्षा मी आयुष्यात पुढे कसं जावं, कुठल्या मार्गाने चालावे याचा विचार करायला हवा. मी माझ्या मताने चालत राहील आणि जे काही चांगलं करता येईल त्याचा प्रयत्न करत राहील. हाच आयुष्यातला चांगला आणि खरा मार्ग आहे, असेही गडकरी म्हणाले.
दुसऱ्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांच्याकडे बोट दाखवून बोलण्यात काहीही अर्थ नाही. हे मला कधीही आवडलेलं नाही. त्यापेक्षा मी स्वतः जर काही सुधारणा करू शकलो तर ते माझ्यासाठी महत्त्वाचे राहील. हाच माझा अजेंडा आहे. मी माझ्यापरी देशासाठी, समाजासाठी, लोकांसाठी काय करू शकतो हा प्रयत्न करत असतो.