अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर यांचे आवाहन
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील हिंदू मुस्लिम बांधवानी गणेशोत्सव व मोहरम हे सण शांततेत साजरे करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर यांनी केले.
अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनच्या वतीने १ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर दरम्यान साजरा होत असलेल्या मोहरम व गणेशोत्सवाच्या धर्तीवर शांतता व कायदा व्यवस्था सुस्थितीत रहावी या साठी आयोजित शांतता समितीच्या व्यापक बैठकीत स्वाती भोर या बोलत होत्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी धस, पोलीस निरीक्षक सिध्दार्थ गाडे, पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी, पो उपनिरीक्षक कांबळे, भालेराव,शिंगाडे यांच्यासह महसुल, नगर परीषद, वीज मंडळाचे अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना स्वाती भोर म्हणाल्या की, अंबाजोगाई शहर एक शांतता प्रिय शहर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे. या ठिकाणचे नागरिक सर्व सण उत्सव एकत्रित येऊन साजरा करत असतात हा इतिहास आहे. त्या मुळे आगामी मोहरम व गणेशोत्सव नागरिकांनी शांततेत साजरे करून प्रशासनास सहकार्य करावे.
या वेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी धस म्हणाले की, आज सर्वत्र पाणी टंचाई, दुष्काळी परस्थिती आहे, त्या मुळे गणेशोत्सव साजरा करताना अनावश्यक खर्चास फाटा मारून अत्यंत साध्या पद्धतीने कसा करता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, वर्गणीसाठी कोणावरही दबाव तंत्राचा वापर करू नये, श्री गणेशाची मूर्ती स्थापन करताना शक्यतो इको फ्रेंडली गणपतीची स्थापना कशी करता येईल यासाठी प्रयत्न करावा आणि गणेशोत्सव व मोहरम हे दोन्ही सण सर्वांनी शांततेत साजरे करावेत.
या बैठकीत पाणी टंचाई लक्षात घेता गणेश विसर्जन करण्यासाठी काही कृत्रिम व्यवस्था करता येईल का यावर विचार विनिमय करण्यात आला. या बैठकीचे प्रास्ताविक व आभार पोलीस निरीक्षक सिध्दार्थ गाडे यांनी मानले.