टीम AM : स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (स्वाराती) स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागाने एक अत्यंत उल्लेखनीय आणि ऐतिहासिक वैद्यकीय यश नोंदवले आहे. 75 वर्षीय वृद्ध महिलेच्या पोटातून तब्बल 9 किलो वजनाचा आणि सुमारे 45 बाय 39 सेंटीमीटर आकाराचा मोठा ट्यूमर यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढण्यात डॉक्टरांच्या पथकाला यश आले आहे. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया 1 जून 2026 रोजी पार पडली. अत्यंत जोखमीची मानली जाणारी ही केस असल्याने वैद्यकीय क्षेत्रात या यशाची विशेष चर्चा होत आहे.
सदर महिला रुग्ण 25 मे रोजी पोट प्रचंड फुगणे आणि तीव्र त्रास या तक्रारींसह रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) दाखल झाली होती. तपासणीत तिला अंडाशयाशी संबंधित मोठी गाठ (mucinous cystadenoma) असल्याचे निदान झाले. गाठीचा आकार मोठा असल्याने आणि ती आतड्यांना चिकटलेली असल्याने शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती. रुग्ण वयोवृद्ध असून त्यांना मधुमेहही असल्याने शस्त्रक्रियेला अतिरिक्त धोका होता. मात्र, नातेवाईकांच्या संमतीनंतर डॉक्टरांनी धाडसी निर्णय घेत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही ‘लॅप्रोटोमी’ शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. पथक प्रमुख डॉ. प्रेषित चाटे यांच्यासह डॉ. नंदकिशोर मोरे, डॉ. वर्षा, डॉ. नेहा, डॉ. अमरा, डॉ. ज्ञानेश्वर सुशील, डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी या यशस्वी शस्त्रक्रियेत सहभाग घेतला. या अद्वितीय कामगिरीबद्दल रुग्णालय प्रशासनाकडून संपूर्ण पथकाचे अभिनंदन करण्यात आले असून, ही घटना वैद्यकीय क्षेत्रातील एक मोठे यश मानले जात आहे.



